Join us  

भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानचे खेळाडू आजारी पडले; आफ्रिदीसह ३-४ जणांना उपचार घ्यावे लागले

ICC ODI World Cup 2023 IND vs PAK : वन डे वर्ल्ड कप २०२३ भारत-पाकिस्तान सामना ब्लॉकबस्टर ठरला. त्यानंतर पाकिस्तानचा संघ आजारी पडला..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 2:40 PM

Open in App

ICC ODI World Cup 2023 IND vs PAK : वन डे वर्ल्ड कप २०२३ भारत-पाकिस्तान सामना ब्लॉकबस्टर ठरला... भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेतील आतापर्यंत झालेल्या सामन्यांना अत्यल्प प्रतिसाद लाभलेला पाहयाला मिळाला.. मोठमोठे स्टेडियम अक्षरशः ओस पडलेले दिसले. पण, अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला India vs Pakistan महामुकाबला पाहण्यासाठी लाखभर प्रेक्षक अन् सेलिब्रेटी, गृहमंत्री अमित शाह आदी उपस्थित होते. भारताला मिळत असलेला पाठींबा पाहून पाकिस्तानी खेळाडू आधीच गोंधळले आणि त्यांचा यजमानांकडून सपाटून मार खावा लागला. या सामन्यानंतर पाकिस्तानचा संघ बंगळुरूला पोहोचला आहे आणि तेथे ३-४ खेळाडू आजारी पडल्याचे वृत्त समोर येतेय.

भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ ३ सामन्यांत ४ गुण व -०.१३७ नेट रन रेटसह चौथ्या स्थानी सरकला आहे. त्यांचा पुढचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध २० तारखेला होणार आहे. पण, त्याआधीच त्यांचे टेंशन वाढले आहे. पाकिस्तानी पत्रकारांनी दिलेल्या बातमीनुसार बंगळुरूला पोहोचल्यावर पाकिस्तान संघातील ३-४ खेळाडूंना एका व्हायरसचा त्रास झाला आणि ते आजारी पडले.

ओसामा मीर हा ४-५ दिवसांपासून गंभीर आजारी होता, परंतु सुदैवाने त्याची प्रकृती आता सुधारली आहे. सलामीवीर अब्दुल्ला शफिक याला ताप आळा होता आणि शाहीन आफ्रिदीही आजारी पडला होता. त्यांना अँटिबायोटिक ड्रॉप्स दिले गेले आहेत. झमन खान हाही आजारी पडला होता आणि आता तो बरा झाला आहे. खेळाडू आजारी पडल्यामुळे पाकिस्तानी संघाचे सराव सत्र रद्द करण्यात आले आहे.

भारताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ १९१ धावांत तंबूत परतला. अब्दुल्ला ( २०), इमाम-उल-हक ( ३६), कर्णधार बाबर आजम ( ५०) आणि मोहम्मद रिझवान ( ४९)     यांच्यामुळे संघ एकवेळेस २ बाद १५५ अशा मजबूत स्थितीत होता. पण, पुढील ३६ धावांत त्यांचे ८ फलंदाज माघारी पाठवले आणि भारताने सामन्यावर पकड घेतली. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात रोहित शर्माने ६३ चेंडूंत ८६ धावांची वादळी खेळी केली आणि श्रेयस अय्यरने नाबाद ५३ धावा करून भारताला ३०.३ षटकांत ३ बाद १९२ धावा करून विजय मिळवून दिला. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध पाकिस्तानऑफ द फिल्ड