मुंबई : सध्या भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगला आहे. देशातील विविध स्टेडियमवर सामने खेळवले जात आहेत. विश्वचषकाच्या विजयाचे साक्षीदार असलेले ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम पुन्हा एकदा मोठ्या व्यासपीठाचे यजमानपद सांभाळण्यासाठी सज्ज आहे. २ नोव्हेंबरला २०११ च्या विश्वचषकातील फायनलिस्ट या स्टेडियमवर आमनेसामने असणार आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या या सामन्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. अशातच मुंबई क्रिकेट असोसिएशनने चाहत्यांना भेट म्हणून काही गोष्टी मोफत देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशन चाहत्यांना मोफत पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक्स देणार आहे. एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे यांनी बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेतील सामन्यानंतर ही घोषणा केली. वानखेडे स्टेडियमवर आगामी काळात भारत विरूद्ध श्रीलंका, ऑस्ट्रेलिया विरूद्ध अफगाणिस्तान आणि १५ नोव्हेंबर रोजी उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. चाहत्यांना तिकिट दाखवून मोफत पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक्सचा लाभ घेता येणार आहे.
२ तारखेला IND vs SL थरार
अमोल काळे यांनी सांगितले की, विश्वचषकातील सामने पाहण्यासाठी येणाऱ्या सर्व चाहत्यांना मी एक वेळचे पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक्स मोफत देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. चाहत्यांच्या तिकिटांवर शिक्का मारल्यानंतर प्रत्येक चाहत्याला मोफत पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक्स दिले जाईल. याचा सर्व खर्च मुंबई क्रिकेट असोसिएशन करेल. आम्ही याची सुरुवात भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यापासून करणार असून ही सेवा उपांत्य फेरीच्या सामन्यापर्यंत सुरू राहील. एमसीएच्या इतर सदस्यांनी या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे.
IND vs SL सामन्याआधी अवतरणार 'क्रिकेटचा देव'
दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या २२ फूट उंच पूर्णाकृती ब्राँझच्या पुतळ्याचे अनावरण वानखेडे स्टेडियमवर १ नोव्हेंबरला होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यापूर्वी हा सोहळा पार पडेल. हा पुतळा चबुतऱ्यासह एकूण २२ फूट उंचीचा आहे. विजय मर्चंट सँट आणि सचिन तेंडुलकर स्टँडच्या मधोमध हा पुतळा उभारण्यात आला असून सध्या हा संपूर्ण पुतळा झाकण्यात आला आहे. यावेळी एमसीएच्या वतीने विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टिने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या नूतनीकरणाची माहितीही देण्यात आली.
Web Title: ICC ODI World Cup 2023 ind vs sl MCA chief amol kale said, Free popcorn and cold drink to be given to all fans at Wankhede Stadium, read here details
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.