ind vs pak world cup 2023 | नवी दिल्ली : ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. मोठ्या कालावधीनंतर भारतातआयसीसीची स्पर्धा पार पडत आहे, त्यामुळे यजमान भारतीय संघाला स्पर्धेचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. विश्वचषकातील सलामीचा सामना विश्वविजेत्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पार पडेल. तर कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे १४ ऑक्टोबर रोजी आमनेसामने असतील. विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपली स्पष्ट भूमिका मांडली असून भारतात येणाऱ्या पाकिस्तानी संघाला कोणतीही विशेष वागणूक दिली जाणार नसल्याचे भारताने म्हटले आहे.
सर्व संघांना समान सुरक्षा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने प्रवक्ते अरिंदम बागची यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. आयसीसी वन डे विश्वचषक २०२३ या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इतर कोणत्याही देशाच्या क्रिकेट संघाप्रमाणेच पाकिस्तानी संघाला वागणूक दिली जाईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. एकूणच इतर संघासोबत जसा व्यवहार केला जाईल तशाच पद्धतीने शेजाऱ्यांना वागणूक दिली जाईल. विश्वचषकातील सुरक्षा व्यवस्थेच्या प्रश्नावर अरिंदम बागची यांनी म्हटले, "अर्थात केवळ पाकिस्तानच नाही, तर इतर सर्व सहभागी संघांनाही योग्य सुरक्षा मिळेल, अशी आमची अपेक्षा आहे."
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या आठवड्यात वन डे विश्वचषक स्पर्धेचे नवीन वेळापत्रक जाहीर केले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १५ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्याची तारीख बदलून १४ ऑक्टोबर करण्यात आली आहे. १५ ऑक्टोबरपासून हिंदू सण नवरात्रीला सुरूवात होत असल्याने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तारीख बदलण्यात आली.
विश्वचषकातील भारताचे सामने -
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नई
- भारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्ली
- भारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबाद
- भारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणे
- भारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशाला
- भारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौ
- भारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबई
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाता
- भारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू