ICC odi world cup 2023, pak vs aus : वन डे विश्वचषकात पाकिस्तानी संघाला सलग दोन सामन्यांमध्ये दारूण पराभवाचा सामना करावा लागला. भारताकडून झालेल्या पराभवानंतर शेजाऱ्यांना ऑस्ट्रेलियाने देखील पराभवाची धूळ चारली. बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ६२ धावांनी 'करेक्ट कार्यक्रम' केला. सलग दोन सामने गमावल्यानंतर पाकिस्तानी संघावर जोरदार टीका होत आहे. अशातच संघाचा माजी खेळाडू वकार युनूसने एक अजब विधान करून सर्वांचे लक्ष वेधले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर वकार युनूस स्टार स्पोर्ट्सच्या पोस्ट मॅच शोमध्ये आरोन फिंच आणि शेन वॉटसन यांच्याशी बोलत होता. दोन्ही ऑस्ट्रेलियन दिग्गज आपल्या संघाच्या विजयाचा आनंद साजरा करत होते. यानंतर वकार युनूस म्हणाला, "मी अर्धा ऑस्ट्रेलियन आहे, मला फक्त पाकिस्तानी म्हणू नका." वकारच्या या विधानाने फिंच आणि वॉटसन हे देखील अवाक् झाले. मात्र, सलगच्या पराभवानंतर वकारला पाकिस्तानी असल्याची लाज वाटली असावी, असे म्हणत चाहत्यांनी निशाणा साधला.
खरं तर वकार युनूसने पाकिस्तानी-ऑस्ट्रेलियन डॉक्टर फरयाल हिच्याशी लग्न केले आहे. तो ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स येथे त्याची तीन मुले आणि पत्नीसह राहतो. या दाम्पत्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. सध्या वकार विश्वचषकाच्या समालोचनासाठी भारतात आहे.
पाकिस्तानी चाहत्यांची टीकावकार युनूसने स्वत:चा बचाव करण्यासाठी हे विधान केले असले तरी पाकिस्तानी चाहते त्याच्यावर निशाणा साधत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते त्याला लक्ष्य करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, "नेहमी लक्षात ठेव, तू प्रथम पाकिस्तानी आहेस. दुसर्याने म्हटले, "वकार भाई, तुला ऑस्ट्रेलियन नागरिकत्व मिळाले असेल, पण तू विश्वचषकाच्या कॉमेंट्री पॅनलमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करत आहेस."