ICC ODI World Cup 2023 : वन डे वर्ल्ड कप २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचा संघ बुधवारी रात्री हैदराबाद येथे पोहोचला आहे. आजपासून वर्ल्ड कप स्पर्धेच्या सराव सामन्याला सुरुवात झाली, परंतु पाकिस्तान-न्यूझीलंड सामना प्रेक्षकांविना खेळवला जातोय. पाकिस्तानी संघाचे भारतात जंगी स्वागत झाले. ७ वर्षांनंतर पाकिस्तानचा संघ भारतात आला आणि भारतीयांचे प्रेम पाहून खेळाडू भारावले. पण, पाकिस्तान क्रिकेट संघाचा सुपर फॅन 'बशीर चाचा' यांना हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
अमेरिकेत राहणारे बशीर चाचा हे पाकिस्तान क्रिकेट संघाचे सुपरफॅन आहेत. ते मेन इन ग्रीनला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण जग फिरतात. ते पाकिस्तानचा झेंडा हातात घेऊन एका स्टेडियममधून दुसऱ्या स्टेडियममध्ये जातात, आपल्या देशाच्या क्रिकेट संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आपले पैसे खर्च करतात. पण, २०२३च्या क्रिकेट वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानी संघ हैदराबादमध्ये उतरला तेव्हा खेळाबद्दलची त्यांची आवड आणि देशावरील प्रेमामुळे ते अडचणीत आले.
बाबर आजम अँड कंपनीचे भारतात स्वागत करण्यासाठी हैदराबाद विमानतळावर पाकिस्तानी ध्वज फडकवल्यानंतर बशीर चाचा यांना हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले. पाकिस्तान संघाचे स्वागत करण्यासाठी विमानतळाबाहेर जमलेल्या अनेक चाहत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची चर्चा होती पण खुद्द काकांनीच याचा इन्कार केला आहे.
बशीर चाचा म्हणाले की, जेव्हा मी पाकिस्तानी संघाचे स्वागत करण्यासाठी तेथे गेलो होतो, तेव्हा मला विमानतळावर चौकशीसाठी कधीही ताब्यात घेतले नाही. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी मला पाकिस्तानचा झेंडा न फडकावण्यास सांगितले होते. त्यांनी फक्त माझा झेंडा घेतला आणि संघ गेल्यानंतर परत दिला. हे एक अप्रतिम स्वागत होते आणि वर्ल्ड कपसाठी भारतात आल्याने मला खूप आनंद होत आहे.