ICC ODI World Cup 2023 Australia vs South Africa Live : सर्वाधिक वेळा वन डे वर्ल्ड कप उंचावणाऱ्या ऑस्ट्रेलियाने यंदाच्या स्पर्धेत निराश केले. ३१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे ६ फलंदाज ७० धावांवर माघारी परतले. स्टीव्ह स्मिथ ( steve Smith) आणि मार्कस स्टॉयनिस यांच्यासाठी दक्षिण आफ्रिकेने घेतलेले DRS योग्य ठरले, परंतु त्याने वादाला फोडणी मिळण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा तंत्रज्ञानावर बोट दाखवले जाऊ शकते.
चतूर आफ्रिकेमुळे ऑस्ट्रेलिया संकटात! स्टीव्ह स्मिथला विकेटवर बसला नाही विश्वास, Video
मिचेल मार्श ( ७) आणि डेव्हिड वॉर्नर (१३) यांना अनुक्रमे मार्को यानसेन व लुंगी एनगिडीने बाद केले. ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सलामीवीर २७ धावांत माघारी परतले. कागिसो रबाडाने त्याच्या पहिल्या षटकात स्टीव्ह स्मिथला ( १९) पायचीत केले. मैदानावरील अम्पायरने नॉट आऊट निर्णय दिला होता. परंतु क्विंटन डी कॉकने आफ्रिकेच्या कर्णधाराला DRS घेण्यास भाग पाडले. नॉन स्ट्रायकर मार्नस लाबुशेन चेंडू बाहेर जातोय असे स्मिथला सांगताना दिसला. पण, प्रत्यक्षात चेंडू स्टम्पवर आदळल्याचे दिसले आणि स्मिथला विश्वास बसेनासा झाला. त्यानंतर रबाडाने पुढच्या षटकात जॉश इंग्लिसचा त्रिफळा उडवला आणि ग्लेन मॅक्सवेल ( ३) याला केशव महाराजने कॉट अँड बोल्ड केले.
मार्कस स्टॉयनिसलाही रबाडाने माघारी पाठवले. रबाडाने टाकलेला बाहेर जाणारा चेंडू स्टॉयनिसने सोडला अन् यष्टिरक्षक क्विंटनने डाईव्ह मारून तो टिपला. त्याने जोरदार अपील केले. अम्पायरने पुन्हा एकदा नाबाद दिले आणि आफ्रिकेने DRS घेतला. त्यात चेंडू स्टॉयनिसच्या बॅटच्या दांड्याला घासून गेल्याचे स्पाईकमध्ये दिसले. पण, स्टॉयनिसच्या म्हणण्यानुसार जेव्हा बॉलचा बॅटीच्या हँडलशी संपर्क झाला तेव्हा त्याचा उजवा हात बॅटपासून दूर होता. तिसऱ्या अम्पायरच्या निर्णयावर स्टॉयनिस आणि लाबुशेन यांनी नाराजी प्रकट केली.