ICC ODI World Cup 2023 SA vs BAN Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत क्विंटन डी कॉकने ( Quinton de Kock ) तिसऱ्या शतकाची नोंद केली. बांगलादेशविरुद्धच्या आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने निराशाजनक सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारली. श्रीलंका (४२८), ऑस्ट्रेलिया ( ३११), इंग्लंड ( ३९९) यांच्यानंतर आज आफ्रिकेने बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई केली. हेनरिच क्लासेन ( Heinrich Klaasen) याने आज मुंबईकरांना आपल्या फटकेबाजीने आनंदीत केले. बांगलादेशच्या क्षेत्ररक्षकांना फार कष्ट पडत नव्हते, कारण त्यांच्याकडे उंच उंच फटके पाहण्यापलीकडे काहीच काम उरलेले दिसले नाही.
क्विंटन डी कॉक ऑन फायर! शतकासह एका फटक्यात मोडला सचिन, गांगुली अन् रोहितचा विक्रम
क्विंटन डी कॉक आणि रिझा हेंड्रिग्कस ( १२) यांना चांगली सुरूवात करता आली नाही. शोरिफूल इस्लामने ७व्या षटकात हेँड्रिग्क्सला त्रिफळाचीत केले. पुढच्या षटकात मेहिदी हसन मिराझने रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( १)ला पायचीत केले. क्विंटन डी कॉक आणि एडन मार्कराम यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी केली. ३१व्या षटकात शाकिब अल हसनने १३१ धावांची ( १३७ चेंडू) भागीदारी तोडली. मार्कराम ६९ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ६० धावांवर झेलबाद झाला. डी कॉक आणि हेनरिच क्लासेन यांनी चौथ्या विकेटसाठी दमदार फटकेबाजी केली.
डी कॉकने यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट कोहलीला ( ३५४) मागे टाकून अव्वल स्थान पटकावले. या वर्ल्ड कप स्पर्धेत आफ्रिकेने ११-४० षटकांत ६.३७च्या सरासरीने ९५६ धावा कुटल्या आहेत आणि त्यात ८४ चौकार व २३ षटकार खेचले आहेत. क्लासेननेही सातत्य राखताना ३४ चेंडूंत आणखी एक अर्धशतक पूर्ण केले. वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या यष्टिरक्षक-फलंदाजांत डी कॉकने आज अॅडम गिलख्रिस्टला ( १४९ धावा वि. श्रीलंका, २००७) मागे टाकले. डी कॉकने आज १४० चेंडूंत १५ चौकार व ७ षटकारांसह १७४ धावांची खेळी केली. त्याने क्लासेनसह चौथ्या विकेटसाठी ८७ चेंडूंत १४२ धावा जोडल्या.