ICC ODI World Cup 2023 SL vs AUS Live : कुसल परेरा आणि पथूम निसंका यांच्या १२५ धावांच्या विक्रमी सलामीनंतर श्रीलंका धावांचा डोंगर उभा करेल, असे वाटले होते. पण, ऑस्ट्रेलियाने चांगली कामगिरी करून दाखवली आणि धडाधड विकेट्स घेतल्या. पॅट कमिन्स ( 2-32) , मिचेल स्टार्क (2-43) आणि अॅडम झम्पा ( 4-47) यांनी दिलेल्या धक्क्यांतून श्रीलंकेला सावरणे अवघड झाले.
यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची कामगिरी काही खास होताना दिसत नाही. सलग दोन पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ आज श्रीलंकेचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरला आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सलामीवीर पथूम निसंका आणि कुसल परेरा यांनी दमदार सुरुवात केली. परेरा व निसंका यांनी १२५ धावांची भागीदारी केली. पॅट कमिन्सने २२ व्या षटकात श्रीलंकेला पहिला धक्का दिला. निसंका ६७ चेंडूंत ६१ धावांवर बाद झाला. ५ षटकानंतर परेराही ७८ ( ८२ चेंडू, १२ चौकार) धावांवर कमिन्सच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.
त्यानंतर अॅडम झम्पाने २ धक्के देऊन ऑस्ट्रेलियाला पुनरागमन मिळवून दिला. कर्णधार कुसल मेंडिस ( ९) व सदीरा समराविक्रमा ( ८) यांना माघारी पाठवलं. पावसाच्या व्यत्ययामुळे बराच काळ सामना थांबला होता. पण, त्यानंतर मिचेल स्टार्कने श्रीलंकेला ५ वा धक्का देताना धनंजया डी सिल्वाला ( ७) माघआरी पाठवले. झम्पाने अप्रतिम मारा करून चमिका करुणारत्ने ( २) व महिष थिक्षणा ( ०) यांना पायचीत करून श्रीलंकेची अवस्थआ ८ बाद १९९ अशी केली. स्टार्कने आणखी एक अप्रतिम चेंडू टाकून त्रिफळा उडवला. लाहिरू कुमारा ( ४) बाद झाला. श्रीलंकेचा संपूर्ण संघ बिनबाद १२५ वरून २०९ धावांवर तंबूत परतला.