ICC ODI World Cup 2023 SL vs AUS Live : माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाने अखेर वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्याकडून हार पत्करावी लागल्यानंतर ऑस्ट्रेलियातील स्पर्धेतील पुढील वाटचाल संकटात सापडली होती. पण, आज त्यांचा सांघिक खेळ पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियाने सोमवारी श्रीलंकेवर दणदणीत विजयाची नोंद केली. श्रीलंकेला सलग तिसरा पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे त्यांना स्पर्धेत टिकायचे असेल तर उर्वरित सर्व सहा सामने जिंकावे लागतील. शिवाय अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागेल. ऑस्ट्रेलियाने या विजयासह दहाव्या क्रमांकावरून गुणतालिकेत ८व्या क्रमांकावर आगेकूच केलीय. श्रीलंकेचा सलग तिसरा पराभव झाल्याने ते ९व्या क्रमांकावर घसरले आहेत.
कुसल परेरा ( ६७) आणि पथूम निसंका ( ७८) यांच्या १२५ धावांच्या विक्रमी सलामीनंतर श्रीलंका धावांचा डोंगर उभा करेल असे वाटले होते. पण, ऑस्ट्रेलियाने चांगली कामगिरी करून दाखवली आणि धडाधड विकेट्स घेतल्या. पॅट कमिन्स ( 2-32) , मिचेल स्टार्क (2-43) आणि अॅडम झम्पा ( 4-47) यांनी दिलेल्या धक्क्यांतून श्रीलंकेला सावरणे अवघड झाले. कमिन्सने सुरुवातीच्या दोन विकेट्स घेतल्या, पाठोपाठा झम्पाने ४ धक्के दिले आणि उरलेली कसर स्टार्कने भरून काढली. बिनबाद १२५ वरून श्रीलंकेचा संपूर्ण संघ २०९ धावांवर तंबूत परतला.
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाची सुरुवात काही खास झाली नाही. दिलशान मधुशंकाने दोन निर्धाव षटकांत दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. डेव्हिड वॉर्नर ( ११) आणि स्टीव्ह स्मिथ ( ०) यांना त्याने पायचीत पकडले. वॉर्नरने अम्पायरच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केलेली दिसली. मिचेल मार्शने आज चांगला खेळ केला अन् वर्ल्ड कपमधील पहिले अर्धशतक झळकावले. ५१ चेंडूंत ९ चौकारांसह ५२ धावा करणारा मार्श रन आऊट झाला. मार्नस लाबुशेन आणि जोश इंग्लिस यांनी श्रीलंकेच्या जोरदार माऱ्याचा सामना केला. दोघांनी ८६ चेंडूंत ७७ धावांची भागीदारी केली. लाबुशेन ४० धावांवर मधुशंकाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. ग्लेन मॅक्सवेल फटकेबाजी करून सामना संपवला. इंग्लिसने ५८ धावा केल्या. मॅक्सवेलने (३१) व मार्कस स्टॉयनिस ( २०) यांनी ३५.२ षटकांत सामना संपवला.