ICC ODI World Cup 2023 squad rules : भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. ऑस्ट्रेलियाने या वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी सुरू केली आहे आणि प्राथमिक संघही जाहीर केला आहे. ऑसी वगळता एकाही संघाने अद्याप वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा प्राथमिक किंवा अंतिम संघ जाहीर केलेला नाही. त्यात भारतीय संघात अजूनही संगितखुर्ची सुरूच असल्याचे पाहायला मिळतेय. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांत विराट कोहली व कर्णधार रोहित शर्मा यांना बाकावर बसवण्यात आले. ते आता पुन्हा विश्रांतीवर गेले आहेत आणि आता आशिया चषक स्पर्धेसाठी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात NCAत होणाऱ्या कॅम्पमध्ये दाखल होतील.
वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला १०-११ वन डे सामने खेळायचे होते आणि त्यापैकी ३ सामने झाले व त्यापैकी २ मध्ये रोहित व विराट नाही खेळले. आता आशिया चषक स्पर्धेसाठी निवडला जाणारा संघच वर्ल्ड कप खेळेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. रोहितचे नेतृत्व आणि राहुल द्रविडचे मार्गदर्शन असलेल्या टीम इंडियात सातत्याने प्रयोग होताना दिसत आहेत. लोकेश राहुल, श्रेयस अय्यर यांच्या फिटनेसबाबत अद्यापही संभ्रम आहेच, त्यामुळे चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवला संधी दिली गेली. पण, ट्वेंटी-२०तला स्पार्क वन डे सामन्यात दाखवण्यात तो अपयशी ठरला.
- ५ सप्टेंबरपर्यंत सर्व संघांनी १५ सदस्यीय प्राथमिक संघ जाहीर करायचा आहे
- २७ सप्टेंबरपर्यंत संघांना त्यांच्या निवडलेल्या खेळाडूंमध्ये बदल करता येणार आहे
- ५ ते २७ सप्टेंबर या कालावधीत निवड समिती संघात बदल करू शकतील, परंतु त्यानंतर ICC ची परवानगी लागेल
- भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत ९ वन डे सामने खेळणार आहे आणि ते १५+ खेळाडूंचा ताफा घेऊन मैदानावर उतरतील.