मुंबई : तब्बल १२ वर्षांनंतर भारतात आयसीसी वन डे विश्वचषकाचा थरार रंगला आहे. यंदाचा विश्वचषक अनेक नकारात्मक कारणांमुळे चर्चेत आहे. प्रेक्षकांनी फिरवलेली पाठ असो की मग ओपनिंग सेरेमनीचा अभाव. ८ ऑक्टोबरला यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना पार पाडला. या सामन्यापूर्वी काही भारतीय चाहत्यांनी ऑफिशियल तिकिट पार्टनर BookMyShowवर अद्याप तिकिटे उपलब्ध असल्याचे सांगितले होते. पण, ऑनलाइन तिकीट बुक करण्यात अडथळा आल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. काहींना मोठ्या प्रयत्नांनंतर जागा मिळवण्यात यश आले. तर अनेकजण पुरेशी माहिती न मिळाल्याने प्रत्यक्ष सामना पाहू शकले नाहीत. त्यामुळे सामन्याआधीच तिकिट 'हाउसफुल' असल्याची अफवा का पसरवली गेली असा सूर चाहत्यांमध्ये पसरला.
विश्वचषकाचा सलामीचा सामना गतविजेत्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला गेला. जगातील सर्वात मोठे मैदान मात्र मोठ्या व्यासपीठावर मोकळे दिसले. उद्घाटनाच्या सामन्याकडेच प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने बीसीसीआयसहआयसीसीची चिंता वाढली. विश्वचषकाच्या सामन्यातही प्रेक्षक नसल्याने बीसीसीआयची फजिती झाली. दुसरीकडे BookMyShowवर सर्व तिकिटे sold out झाल्याचे सांगण्यात आले. एकूणच 'हाउसफुल' पण स्टेडियममध्ये प्रेक्षकांचा दुष्काळ अशी स्थिती उद्भवली.
तिकिटांवरून 'मनमानी'
तिकिटांच्या विक्रीवरून प्रश्न उठत असतानाच इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या एका वृत्ताने संभ्रमात आणखी भर घातली. इंडियन एक्सप्रेसने स्थानिक राजकारण्याचा हवाला देत म्हटले होते की, जवळपास ३० ते ४० हजार महिलांना विश्वचषक सलामीच्या सामन्यासाठी अल्पोपाहारासह मोफत तिकिटे दिली जात आहेत. अलीकडेच संसदेत महिला आरक्षण विधेयकाला मान्यता दिल्याने सत्ताधारी पक्षाकडून हे पाऊल उचलले जात आहे. एकूणच महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने इथे त्यांना सवलत दिली गेली. पण, यामागे कोणाचा हात होता हे अद्याप कळू शकले नाही.
इंडियन एक्सप्रेसने वृत्त देताच क्रिकेट विश्वात एकच खळबळ माजली. इतक्या मोठ्या संख्येने तिकिटे कशी दिली जाऊ शकतात? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. खरं तर BookMyShow वर भारतातील सामन्यांसाठी जास्तीत जास्त दोन आणि गैर-भारतीय सामन्यांसाठी चार तिकिटे बुक करण्याची मुभा आहे. त्यामुळे सलामीच्या सामन्यासाठी बुक झालेली एवढी तिकिटे कोणाच्या मालकीची होती? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
दरम्यान, वन डे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यातच आयसीसीला उशीर झाल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे दिसते. त्यामुळेच विश्वचषक स्पर्धेसाठी तिकीटे काढण्याच्या प्रक्रियेत कमालीचा उशीर झाला. खरं तर २७ जूनला विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले होते आणि नंतर ९ ऑगस्ट रोजी पुन्हा सुधारित करण्यात आले.
BCCIचा भोंगळ कारभार
आयसीसी आणि यजमान बीसीसीआयने विश्वचषकाच्या भोंगळ कारभाराबद्दल अद्याप मौन बाळगले आहे. अनेकांनी याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. पण, बीसीसीआयसह आयसीसीने देखील उघडपणे काहीच भाष्य केले नाही. ESPNcricinfoने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) विश्वचषक सामन्यांचे आयोजन करणार्या राज्य संघटनांना सांगितले की, प्रत्येक मैदानात प्रायोजक, व्यावसायिक भागीदार, आयसीसी आणि बीसीसीआय यांच्या पाहुण्यांसाठी काही तिकिटे बाजूला ठेवावी लागतील. तसेच BCCI ने विनंती केली की राज्यांनी शक्य तितकी राखीव तिकिटे जाहीर करावीत. अन्यथा स्थानिक सदस्य क्लब, प्रायोजक, माजी क्रिकेटपटू, आजीवन सदस्य, पोलीस, स्थानिक सरकारी अधिकारी जे सहसा आंतरराष्ट्रीय आणि IPL दोन्हीसाठी तिकिटे वापरतात त्यांची यादी जाहीर करावी. कारण ते मोठ्या प्रमाणात तिकिटांच्या विक्रीवर परिणाम करतात.
वन डे विश्वचषकातील या कारभाराबद्दल जाणकारांनी आपापली मतं मांडली आहे. मात्र, स्पोर्टस्टारने दिलेल्या माहितीनुसार, कोलकातातील ईडन गार्डन्स या मैदानात ६५ हजार प्रेक्षक बसू शकतात. पण, विश्वचषकातील सामन्यासाठी सर्वसामान्यांना या मैदानावर केवळ ३२,००० तिकिटे उपलब्ध आहेत. चेपॉक येथे ३७ हजार एवढी प्रेक्षक क्षमता आहे, तिथे फक्त १३,००० तिकिटे विक्रीसाठी सोडण्यात आली आहेत. तर, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामान्यांसाठी १ लाख तिकिटे उपलब्ध आहेत.
चाहत्यांचा आक्रोश
विश्वचषक सुरू होण्याच्या ४२ दिवस आधी २३ ऑगस्टलाच BCCI ने BookMyShow ला बोर्डात आणण्याची घोषणा केली होती. लक्षणीय बाब म्हणजे मैदानात प्रेक्षकांचा दुष्काळ असताना देखील ऑनलाइन तिकिटे उपलब्ध नसल्याचा अनुभव चाहत्यांना आला. स्पर्धेला सुरूवात होण्यापूर्वी तिकीटे खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेकांनी सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला. मात्र, सर्व तिकिटे 'सोल्ड आउट' झाल्याचे सांगण्यात आले. पण अनेक चाहत्यांना बिगर भारतीय सामन्यांसाठीच केवळ तिकिटे मिळू शकली. त्यामुळे हे नेमकं कशामुळे घडलं? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याप्रकरणी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले की, राखीव ठेवण्यात आलेली तिकिटे काही ठरावीक व्यक्तींसाठी आहेत. 'ऑप्शन टू बाय' अंतर्गत कराराच्या जबाबदाऱ्या आणि वचनबद्धतेचा भाग म्हणून यापूर्वी विविध भागधारकांसाठी काही तिकिटे राखून ठेवण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे भारत आणि पाकिस्तान या सामन्यासाठी सर्व तिकिटांची विक्री झाली असल्याचे BookMyShowवर सांगितले जात आहे. पण सत्य काय ते येणारा काळच ठरवेल.
Web Title: ICC ODI world cup 2023 tickets consistently show full on BookMyShow, fans target BCCI with ICC
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.