icc odi world cup 2023 : तब्बल सात वर्षांनंतर पाकिस्तानी संघ भारतीय भूमीवर आला आहे. ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वन डे विश्वचषकाचे सराव सामने सुरू झाले आहेत. शुक्रवारी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सामना खेळवला जात आहे. अशातच पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार युनूसने आपल्या संघाची कमजोर बाजू सांगितली. वकार युनूसने विश्वचषकापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाच्या चांगल्या तयारीचा दाखला देत विश्वचषकासाठी भारत हा पाकिस्तानपेक्षा चांगला संघ असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, भारतीय संघाने अलीकडेच आशिया चषक जिंकला आणि कोलंबो येथे झालेल्या सुपर ४ च्या सामन्यात आपला कट्टर प्रतिस्पधी पाकिस्तानचा २२८ धावांनी दारूण पराभव केला. विश्वचषकात भारताचा सामना अहमदाबादमध्ये १४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानशी होणार आहे. याबद्दल बोलताना युनूसने सांगितले की, दोन्ही संघांवर दबाव असेल, पण यजमान भारतीय संघ विजयाचा दावेदार आहे हे नक्की.
पाकिस्तान कमकुवत संघ - युनूस
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना युनूसने म्हटले, "आपल्या सर्वांना माहित आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना सर्वात मोठा असतो. चाहते देखील याचा आनंद घेत असतात. हा सामना म्हणजे खेळाची जननी आहे. त्यामुळे अहमदाबादमध्ये या सामन्याच्या वेळी पाकिस्तानवर नक्कीच दबाव असेल. पण, भारतीय संघाच्या तुलनेत पाकिस्तानी संघ कमकुवत आहे. स्टेडियममधील गर्दीमुळे दोन्ही संघांवर दबाव निर्माण होणार असल्याने भारतावरही दबाव असेल."
वकार युनूसने आणखी सांगितले की, दोन्ही संघ पाहिले तर भारत मजबूत स्थितीत आहे. नसीम शाहची अनुपस्थिती पाकिस्तानला मोठा धक्का आहे. रोहितसेनेत चांगले फिरकीपटू आहेत, त्यांच्याकडे स्टार फलंदाजांची फळी देखील आहे. मला वाटते की, दुसरा कोणताही संघ सध्या भारताशी बरोबरी करू शकत नाही कारण त्यांच्याकडे कुलदीप, जडेजासारखे चांगले फिरकीपटू आहेत.
विश्वचषकासाठी पाकिस्तानी संघ -
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उप कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सलमान आगा, सौद शकील, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, सॅम मीर, हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, हसन अली आणि शाहीन आफ्रिदी.
राखीव खेळाडू - मोहम्मद हारिस, जमान खान, अबरार अहमद.
Web Title: icc odi world cup 2023 waqar younis said pakistan team is very weak compared to team india
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.