संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलेला क्रिकेट वर्ल्डकप २०२३ सुरू व्हायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. भारतात होणारी ही विश्वचषक स्पर्धा १० मैदानांवर खेळवली जाणार असून, ती ४६ दिवस चालणार आहे. यामध्ये एकूण ४८ सामने खेळवले जाणार आहेत. प्रत्येक संघ गटसाखळीमध्ये ९ सामने खेळणार आहे. तसेच त्यानंतर उपांत्य आणि अंतिम सामने खेळवले जातील. आता या स्पर्धेदरम्यान, पावसाने अडथळा आणल्यास काय होईल, याची माहिती पुढील प्रमाणे.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून १९ नोव्हेंबरपर्यंत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील गटसाखळीतील सामन्यांसाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवलेला नाही. अशा परिस्थितीत गटसाखळीमध्ये कुठलाही सामना पावसामुळे रद्द करावा लागल्यास किंवा निकाल न लागल्यास दोन्ही संघांमध्ये गुणांची विभागणी होईल. स्पर्धेतील पहिला उपांत्या सामना १५ नोव्हेंबर रोजी मुंबईत आणि दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबर रोजी कोलकातामध्ये खेळवला जाणार आहे. या दोन्ही सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. त्या सामन्यासाठी २० नोव्हेंबर हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. बाद फेरीतील सर्व सामने हे दिवस-रात्र पद्धतीने खेळवले जाणार आहेत.
या विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी गतविजेता इंग्लंड आणि गतउपविजेता न्यूझीलंडमध्ये खेळवला जाणार आहे. तर भारतीय संघ घरच्या मैदानावरील आपल्या अभियानाची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. तर भारत आणि पाकिस्तानमधील सामना १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी एक लाखांहून अधिक प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील दिवसाचे सामने हे सकाळी १०.३० वाजता सुरू होणार आहेत. तर दिवस-रात्र सामने दुपारी २ वाजता सुरू होईल.