ICC ODI World Cup AFG vs AUS Live : त्याला नीट चालताही येत नव्हते आणि तो हलूही शकत नव्हता, परंतु त्याने उभ्या उभ्या सामना फिरवला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात आजच्या सामन्याची नोंद थरारक लढतींपैकी एक अशी होईल. ऑस्ट्रेलियाचे ७ फलंदाज ९१ धावांवर माघारी परतले होते आणि समोर २९२ धावांचे लक्ष्य होते. तळाच्या फलंदाजांना सोबत घेऊन हे अशक्यच होते. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची कामगिरी पाहता, हा सामना ऑस्ट्रेलिया जिंकेल याची शक्यता फक्त ११ टक्के लोकांनाच होती. पण, ग्लेन मॅक्सवेलचे वादळ घोंगावले.. तू फक्त उभा राहा असा मॅसेज त्याने पॅट कमिन्सला दिला आणि या पठ्ठ्याने दुसऱ्या बाजूने प्रहार केला. मांडीचे स्नायू ताणल्यामुळे मॅक्सवेलला पळताही येत नव्हते, तरीही तो मैदानावर उभा राहिला. त्याने एका पायावर ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देताना द्विशतक झळकावले. ऑस्ट्रेलियाने विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला.
वेगवान गोलंदाज नवीन उल हकने त्याच्या पहिल्या दोन षटकांत ट्रॅव्हीस हेड ( ०) व मिचेल मार्शला ( २४) माघारी पाठवले. अझमतुल्लाह ओमारजाईने सलग दोन चेंडूंवर डेव्हिड वॉर्नर ( १८) आणि जॉश इंग्लिसला बाद केले. मार्नस लाबुशेन ( १४ ) रन आऊट झाला. मार्कस स्टॉयनिस ( ६) व मिचेल स्टार्क ( ३) हे राशीद खानचे शिकार ठरले. विजयासाठी २९२ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे ७ फलंदाद ९१ धावांत तंबूत परतले. पण, ग्लेन मॅक्सवेल लढला. त्याने ७६ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह शतक झळकावले.
तत्पूर्वी, इब्राहिम झाद्रानचे शतक अन् राशीद खानच्या फटकेबाजीच्या जोरावर अफगाणिस्तान वर्ल्ड कप इतिहासातील त्यांची सर्वोत्तम धावसंख्या उभी केली. अफगाणिस्तानने ५ बाद २९१ धावा उभ्या केल्या. राशीदने १७ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ३५ धावा चोपल्या. झाद्रान १४३ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह १२९ धावांवर नाबाद राहिला. यापूर्वी २०१९मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांनी सर्वबाद २८८ धावा केल्या होत्या. रहमत ( ३०), शाहिदी ( २६), अजमतुल्लाह ( २२) व गुरबाज ( २१) यांनीही योगदान दिले.