ICC ODI World Cup AFG vs AUS Live : पाच वेळच्या वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाची गाडी आज पुन्हा रुळावरून घसरली. या वर्ल्ड कपमध्ये त्यांची सुरुवात काही खास झालेली नव्हती, परंतु त्यांनी सलग ४ विजय मिळवून उपांत्य फेरीच्या शर्यतीत अचानक मुसंडी मारली. पण, या स्पर्धेत करिष्माई कामगिरी करणाऱ्या अफगाणिस्तानने त्यांना रडकुंडीला आणले. त्यांचे ४ फलंदाज ४९ धावांवर माघारी परतले होते आणि त्यानंतर ऑसींकडून रडारड सुरू झाली. त्यांन अफगाणिस्तान संघाचा मेंटॉर व भआरताचा माजी खेळाडू अजय जडेजा याची तक्रार केली.
मुंबईच्या वानखेडेवर २०१७मध्ये न्यूझीलंडने भारताविरुद्ध ४ बाद २८४ धावा करून सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग केला होता. हा विक्रम आज मोडण्याची ऑसींना संधी आहे.. पण, त्यांना दुसऱ्याच षटकात धक्का बसला.. नवीन उल हकने सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला भोपळ्यावर माघारी पाठवले आणि पुढच्या षटकात नवीनने मिचेल मार्शला ( २४) पायचीत केले. मार्श आक्रमक फटकेबाजी करत होता आणि तो बाद होण्यापूर्वी नवीनच्या गोलंदाजीवर त्याने चौकार-षटकार खेचले होते. डेव्हिड वॉर्नरकडून आशा होती, परंतु अझमतुल्लाहने अप्रतिम चेंडूवर त्याचा ( १८) त्रिफळा उडवला अन् पुढच्याच चेंडूवर जॉश इंग्लिसला माघारी पाठवले. पहिल्या १० षटकांत ऑस्ट्रेलियाच्या ४ बाद ५२ धावा झाल्या.
मार्नस लाबुशेन मैदानावर होता, परंतु तो साईड स्क्रीनकडे इशारा करून गोलंदाजाला रोखताना दिसला. यामुळे अफगाणिस्तानचे खेळाडू चिडले होते. साईड स्क्रीनच्या वरच अफगाणिस्तानची ड्रेसिंग रुम आहे आणि तिथे हालचाल सुरू असल्याने फलंदाजीत व्यत्यय येत असल्याचे लाबुशेनचे म्हणणे होते. त्यामुळे तो सातत्याने गोलंदाजा चेंडू टाकायला जाणार त्याचवेळी मागे हटत होता. पण, लाबुशेन १४ धावांवर रन आऊट झाला आणि ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ ६९ धावांत तंबूत परतला.