Join us  

अफगाणिस्तानचा विजय, पाकिस्तानच्या पोटात 'गोळा'! उपांत्य फेरीच्या मार्गात खोडा

ICC ODI World Cup AFG vs NED Live : अफगाणिस्तानने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयी मालिका कायम राखताना आज नेदरलँड्सचा पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 8:05 PM

Open in App

ICC ODI World Cup AFG vs NED Live : अफगाणिस्ताननेवन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयी मालिका कायम राखताना आज नेदरलँड्सचा पराभव केला. अफगाणिस्तानच्या या विजयाने पाकिस्तानच्या पोटात 'गोळा' आणला आहे. अफगाणिस्तान ७ सामन्यांत ४ विजय मिळवून ८ गुणांसह आता पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे आणि पाकिस्तान सहाव्या क्रमांकावर घसरला आहे. 

नेदरलँड्सला पहिल्या षटकात धक्का बसल्यानंतर मॅक्स ओडोव ( ४२) आणि कॉलिन एकरमन ( २९) यांनी ७० धावांची भागीदारी केली. पण, नेदरलँड्सच्या फलंदाजांनी रन आऊटची मालिका सुरू केली. दोन्ही सेट फलंदाजांनंतर कर्णधार स्कॉट एडवर्ड ( ०) रन आऊट झाला. बॅस डे लीड ( ३) हाही बाद झाला. सायब्रँड एंगेलब्रेचने ८६ चेंडूंत ५८ धावांची खेळी करून नेदरलँड्सला सावरले होते, परंतु तोही रन आऊट झाला. नेदरलँड्सचा संपूर्ण संघ ४६.३ षटकांत १७९ धावांवर तंबूत परतला. मोहम्मद नबीने ३ व नूर अहमदने दोन विकेट्स घेतल्या. वर्ल्ड कप स्पर्धेत एका इनिंग्जमध्ये ४ किंवा त्यापेक्षा अधिक फलंदाज रन आऊट होण्याची ही १२वी वेळ आहे. अफगाणिस्तानने या वर्ल्डमध्ये ७ सामन्यांत सर्वाधिक १९८ षटकं फिरकीपटूंकडून टाकून घेतली, त्यानंतर न्यूझीलंडचा ( १४७.४) क्रमांक येतो. 

अफगाणिस्तानसाठी रहमनुल्लाह गुरबाज व इब्राहिम झाद्रान यांनी आक्रमक सुरुवात करून नेट रन रेट सुधारण्याचा प्रयत्न केला. अफगाणिस्तानचा या सामन्यापूर्वी -०.७१८ असा नेट रन रेट होतो आणि तो पॉझिटिव्ह करण्यासाठी त्यांना १०.१ षटकांत १८० धावा करायच्या होत्या, परंतु ते अशक्य होते.  ६व्या षटकात लोगन व्हॅन बीकने अफगाणिस्तानच्या गुरबाज ( १०)ला माघारी पाठवले. झाद्रानही ( २०) रोएलॉफ व्हॅन डेर मर्वच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि अफगाणिस्तानने १०.१ षटकांत दोन्ही सलामीवीर गमावले. पण, रहमत शाह आणि हशमतुल्लाह शाहिदी यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७४ ( ७७चेंडू) धावांची भागीदारी केली. रहमत शाह ५२ धावांवर साकिब जुल्फिकारच्या गोलंदाजीवर कॉट अँड बोल्ड झाला. पण, अझमतुल्लाह ओमारझई ( ३१*) आणि शाहिदी ( ५६*) यांनी दमदार खेळी करून अफगाणिस्तानचा ७ विकेट्स राखून विजय पक्का केला. अफगाणिस्तानने ३१.३ षटकांत ३ बाद १८१ धावा केल्या. 

पाकिस्तानची झालीय कोंडी....

अफगाणिस्तानला उर्वरित २ सामन्यांत ऑस्ट्रेलिया ( ७ नोव्हेंबर) आणि दक्षिण आफ्रिका ( १० नोव्हेंबर) यांचा सामना करायचा आहे. त्यापैकी १ सामना जिंकूनही ते उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला कायम राखू शकतात. पण, नेट रन रेटची भूमिका महत्वाची ठरेल. तेच पाकिस्तानला २ लढतींत न्यूझीलंड ( ४ नोव्हेंबर) आणि इंग्लंड ( ११ नोव्हेंबर) यांना पराभूत करावेच लागेल. त्यानंतही त्यांचे १० गुण होतील आणि इतरांची कामगिरी व स्वतःचा नेट रन रेट यावर त्यांचे गणित अवलंबून असेल... 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपअफगाणिस्तानपाकिस्तान