ICC ODI World Cup AFG vs SA Live : अफगाणिस्तानचेवन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पण, आज अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला कडवी टक्कर दिली. अझमतुल्लाह ओमारझाई ने ( नाबाद ९७ ) उल्लेखनीय फलंदाजी करून आफ्रिकेसमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. पण, अफगाणिस्तानला आज उपांत्य फेरीचं गणित सोडवण्यात अपयश आले अन् न्यूझीलंडचे चौथे स्थान अधिक मजबूत झाले. अफगाणिस्तानचे ६ फलंदाज ११६ धावांत माघारी परतले होते, परंतु त्यांच्या शेवटच्या फळीने १००+ धावा जोडल्या. वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच प्रतिस्पर्धी संघाने सहा विकेट्स गमावूनही शेवटच्या फळीसह आफ्रिकेविरुद्ध १०० हून अधिक धावा चोपल्या.
अझमतुल्लाह ओमारझाई आणि राशीद खान यांनी सातव्या विकेटसाठी चांगली खेळी केली. अझमतुल्लाहने या वर्ल्ड कपमधील त्याचे तिसरे अर्धशतक पूर्ण केले. राशीद व ओमारझाई यांची ४४ धावांची भागीदारी अँडिले फेहलुक्वायोने तोडली, राशीद १४ धावांवर झेलबाद झाला. नूर अहमद ( २६) आणि अझमतुल्लाह यांनी ४४ धावांची भागीदारी केली. मुजीब उर रहमान ( ८) बाद झाल्यानंतरही अझमतुल्लाहने एका बाजूने फटकेबाजी सुरूच ठेवली. अफगाणिस्तानने ५० षटकांत २४४ धावा उभ्या केल्या. अझमतुल्लाह १०७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ९७ धावांवर नाबाद राहिला. ५०व्या षटकात शतकासाठी त्याला ४ धावा हव्या होत्या, परंतु कागिसो रबाडाने त्याला त्या करू दिल्या नाही.
क्विंटन डी कॉकचा रेकॉर्डक्विंटन डी कॉकने आजच्या सामन्यात यष्टींमागे ६ झेल पकडले आणि वर्ल्ड कपमध्ये एकाच सामन्यात ६ किंवा त्यापेक्षा अधिक झेल घेणारा तो तिसरा यष्टीरक्षक ठरला. अॅडम गिलख्रिस्ट ( वि. नामिबिया, २००३) आणि सर्फराज अहमज ( वि. दक्षिण आफ्रिका, २०१५) यांनी अशी कामगिरी केली आहे. वर्ल्ड कप इतिहासात एकाच सामन्यात ५ झेल पडणारा तो सातवा यष्टीरक्षक ठरला. गिलख्रिस्ट, सर्फराज, रिडली जेकब्स, सय्यद किरमानी, टॉम लॅथम व उमर अकमल यांनी ही कामगिरी केली आहे.