Join us  

मन जिंकून अफगाणिस्तानचा निरोप! दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी शेवटपर्यंत झुंजवले

ICC ODI World Cup  AFG vs SA Live  : अफगाणिस्तानचे वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पण, आज अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला कडवी टक्कर दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 9:53 PM

Open in App

ICC ODI World Cup  AFG vs SA Live  : अफगाणिस्तानचेवन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पण, आज अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला कडवी टक्कर दिली. २४४ धावांसाठी आफ्रिकेला त्यांनी शेवटच्या षटकापर्यंत झुंज देण्यास भाग पाडले. अफगाणिस्तानने त्यांच्या फिरकीपटूंचा योग्य वापर करून आफ्रिकेच्या धावांवर अंकुश आणले होते आणि रोमहर्षक विजयासह ते स्पर्धेचा निरोप घेतात का, अशी शक्यता निर्माण झाली होती. पण, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन त्यांच्या मार्गात आडवा आला आणि अँडीले फेहलुकवायोने सामना ४८व्या षटकात संपवला. 

आफ्रिकेला नेहमीप्रमाणे क्विंटन डी कॉकने आक्रमक सुरुवात करून दिली. टेम्बा बवुमा ( २३) संघर्ष करताना दिसला, त्यात त्याच्या पायात गोळा आला. ११व्या षटकात ६४ धावांवर आफ्रिकेला पहिला धक्का बसला, त्यापाठोपाठा १४व्या षटकात क्विंटन पायचीत झाला. क्विंटन ४७ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ४१  धावांवर बाद झाला. एडन मार्करम व रॅसी व्हॅन डेर ड्युसेन यांनी अर्धशतकी भागीदारी करून सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न केला. पण, राशीद खानने ही जोडी तोडली आणि मार्करम ( २५) झेलबाद झाला. हेनरिच क्लासेनचा झेल पुढच्या चेंडूवर सुटला, परंतु राशीदनेच त्याला ( १०) त्रिफळाचीत केले.

व्हॅन डेर ड्युसेन व डेव्हिड मिलर यांनी आफ्रिकेचा डाव सावरला. अफगाणिस्तानने फिरकी मारा सुरू ठेवून आफ्रिकेच्या धावगतीवर लगाम लावली होती. डेर ड्युसेन व मिलर यांनी ४३ धावांची भागीदारी केली, परंतु मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर मिलर ( २४) हातात झेल देऊन माघारी परतला. राशीद, नबी व उर रहमान यांच्या फिरकीने आफ्रिकेला दडपणाखाली ठेवले होते. नवीन उल हकला ४४व्या षटकात पुन्हा बोलावले गेले आणि त्यावर अँडील फेहलुकवायोचा झेल सुटला. हा गेम चेंजर क्षण ठरला असता. नूर अहमदची ३ षटकं अखेरच्या टप्प्यासाठी राखून ठेवली होती. फेहलुकवायोने नवीनला दोन खणखणीत षटकार खेचून सर्व दडपण झुगारून टाकले. या दोघांनी ६५ धावांची भागीदारी करून ४७.३ षटकांत ५ बाद २४७ धावांसह विजय मिळवला. ड्युसेन ७६ धावांवर आणि फेहलुकवायो ३९ धावांवर नाबाद राहिला. 

तत्पूर्वी, अझमतुल्लाह ओमारझाई ने ( नाबाद ९७ ) उल्लेखनीय फलंदाजी करून आफ्रिकेसमोर २४५ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. अफगाणिस्तानचे ६ फलंदाज ११६ धावांत माघारी परतले होते, परंतु त्यांच्या शेवटच्या फळीने १२८ धावा जोडल्या. वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच प्रतिस्पर्धी संघाने सहा विकेट्स गमावूनही शेवटच्या फळीसह आफ्रिकेविरुद्ध १०० हून अधिक धावा चोपल्या.  राशीद ( १४) व ओमारझाई यांची ४४ धावांची भागीदारी केली, त्यानंतर नूर अहमद ( २६) आणि अझमतुल्लाह यांनी ४४ धावांची भागीदारी केली. अझमतुल्लाह १०७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ९७ धावांवर नाबाद राहिला.  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपअफगाणिस्तानद. आफ्रिका