ICC ODI World Cup AFG vs SA Live : अफगाणिस्तानने हा वर्ल्ड कप खऱ्या अर्थाने गाजवला. भारतीय खेळपट्टींशी एकरूप होत त्यांनी तगड्या संघांना पराभूत केले आणि वर्ल्ड कप इतिहासातील त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. ८ सामन्यांत त्यांनी ४ विजय मिळवून स्वतःला उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम ठेवले, परंतु नेट रन रेटमध्ये त्यांनी मार खाल्ला... आज त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांविरुद्ध सकारात्मक सुरुवात केली, परंतु नंतर ते ढेपाळले. डेव्हिड मिलरने घेतलेला अफलातून झेल चर्चेचा ठरला.
आज अखेरच्या साखळी सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना चांगला चोप दिला. रहमनुल्लाह गुरबाज ( २५) व इब्राहिम झाद्रान ( १५) यांनी भले मोठी खेळी केली नसली तरी त्यांनी सहकाऱ्यांसाठी एक माहोल तयार करून ठेवला. रहमत शाह ( २६) याच्या विकेटने आफ्रिकेने सामन्यात पुनरागमन केले. कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी ( २), इक्रम अलिखिल ( १२) व मोहम्मद नबी ( २) हे अपयशी ठरले. अफगाणिस्तानच्या पहिल्या सहा विकेट्समध्ये लुंगी एनगिडी व गेराल्ड कोएत्झी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत महत्त्वाचा वाटा उचलला.
२४व्या षटकात एनगिडीच्या गोलंदाजीवर रहमत शाहने ऑफ साईडचा चेंडू बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने टोलावला. तिथे उभ्या असलेल्या मिलरला तो तिसऱ्या प्रयत्नात टिपता आला. या झेलनंतर एनगिडीने देवाचे आभार मानले.