ICC ODI World Cup AUS vs NED Live : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या ४८ वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद आज ऑस्ट्रेलियाने केली. डेव्हिड वॉर्नर व ग्लेन मॅक्सवेल यांच्या खणखणीत शतकांच्या जोरावर ऑसींनी ३९९ धावांचा डोंगर उभा केला आणि प्रत्युत्तरात नेदरलँड्सचा संपूर्ण संघ २१ षटकांत ९० धावांवर तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाने ३०९ धावांनी हा सामना जिंकला आणि गुणतालिकेत मोठा फेरबदल केला.
वॉर्नरने ९३ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह १०४ धावा केल्या, तर मॅक्सवेने ४४ चेंडूंत ९ चौकार व ८ षटकारांच्या मदतीने १०६ धावा चोपल्या. स्टीव्ह स्मिथ ( ७१), मार्नस लाबुशेन ( ६२) यांची चांगले योगदान दिले. वॉर्नरने वर्ल्ड कप स्पर्धेतील सहावे शतक झळकावताना सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. वर्ल्ड कप स्पर्धेत मॅक्सवेलने ४० चेंडूंत शतक ठोकून सर्वात वेगवान सेन्च्युरीचा विक्रम नावावर केला. ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ८ बाद ३९९ धावा केल्या.
प्रत्युत्तरात, नेदरलँड्सकडून विक्रमजीत सिंगने सर्वाधिक २५ धावा केल्या. अॅडम झम्पाने ३ षटकांत ८ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. मिचेल मार्शने दोन, तर पॅट कमिन्स, जोश हेझलवूड व मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. पहिल्या दोन सामन्यांतील पराभवानंतर ऑसींनी सलग तीन विजय मिळवले आणि ६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. पाकिस्तान पाचव्या स्थानावर सरकला. ऑस्ट्रेलियाची हीच घोडदौड सुरू राहिल्यास ते उपांत्य फेरीत प्रवेश करू शकतात.