ICC ODI World Cup AUS vs NED Live : सूर गवसलेल्या ऑस्ट्रेलियाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत मोठ्या विजयाची नोंद केली. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात डेव्हिड वॉर्नर व ग्लेन मॅक्सवेल यांच्या शतकाने कमाल करून दाखवली. मॅक्सवेलने आज वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठोकले. त्यानंतर कांगारूंच्या गोलंदाजांनी भेदक मारा करून नेदरलँड्सचा संघ शंभरीच्या आत गुंडाळला. वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाचा हा सर्वात मोठा विजय ठरला.
वॉर्नर व स्टीव्ह स्मिथ ( ७१) या अनुभवी जोडीने ११८ चेंडूंत १३२ धावांची भागीदारी केली. मार्नस लाबुशेनने ( ६२) वॉर्नरसोबत ८४ धावा जोडल्या. वॉर्नरने वर्ल्ड कप स्पर्धेतील सहावे शतक झळकावताना सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. वॉर्नर ९३ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह १०४ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर मॅक्सवेलचे वादळ घोंगावले. त्याने ४४ चेंडूंत १०६ धावा चोपल्या. त्यात ९ चौकार व ८ षटकारांचा समावेश होता. वर्ल्ड कप स्पर्धेत मॅक्सवेलने ४० चेंडूंत शतक ठोकून सर्वात वेगवान सेन्च्युरीचा विक्रम नावावर केला. ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत ८ बाद ३९९ धावा केल्या.
एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणे नेदरलँड्ससाठी जड जाणार हे माहीतच होते आणि तसे घडलेही. मिचेल स्टार्कने पाचव्या षटकात डचचा ओपनर मॅक्स ओ डावड ( ६) याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर मॅक्सवेलच्या चपळ क्षेत्ररक्षणामुळे दुसरा सलामीवीर विक्रमजीत सिंग ( २५) रन आऊट झाला. कॉलिन एकरमन ( १०), सायब्रँड इंग्लेबर्च ( ११), बॅस डे लीड ( ४) हे माघारी परतल्याने नेदरलँड्सची अवस्था ५ बाद ५३ अशी झाली. कर्णधार स्कॉट एडवर्ड व तेजा निदामनुरू ( १४) यांनी काहीकाळ डाव सावरला होता. पण, मिचेल मार्शने ही जोडी तोडली. त्यानंतर अॅडम झम्पाने धडाधड दोन धक्के दिले आणि डचचे ८ फलंदाज ८६ धावांवर माघारी परतले. झम्पाने आणखी दोन धक्के देऊन नेदरलँड्सचा संघाला ९० धावांवर गुंडाळले. ऑस्ट्रेलियाने ३०९ धावांनी विजय मिळवला. झम्पाने ४ विकेट्स घेतल्या.
Web Title: ICC ODI World Cup AUS vs NED Live : Australia won by 309 runs, They have recorded the highest-ever win by runs in CWC history
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.