ICC ODI World Cup AUS vs NED Live : सूर गवसलेल्या ऑस्ट्रेलियाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील आजच्या सामन्यात नेदरलँड्सची धुलाई केली. डेव्हिड वॉर्नरची ( David Warner) झेल टाकणे किती महागात पडू शकते, हे नेदरलँड्सला समजले असेलच. त्याने यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग दुसरे आणि एकंदर ६ वे शतक झळकावून मोठा पराक्रम केला. मार्नस लाबुशेन व स्टीव्ह स्मिथ यांनी अर्धशतकं झळकावली, तर ग्लेन मॅक्सवेलने अखेरच्या षटकांत केलेली फटकेबाजी भाव खावून गेली. त्याने अवघ्या ४० चेंडूंत शतक पूर्ण केले.
वॉर्नरने शतक झळकावले आणि त्याच षटकात बॅस डे लीडने ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. जोश इंग्लिस १४ धावांवर झेलबाद झाला. पुढच्या षटकात वॉर्नरची विकेट मिळवण्यात नेदरलँड्सला अखेर यश मिळाले. लोगन व्हॅन बिकने ही विकेट घेतली. वॉर्नर ९३ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह १०४ धावांवर झेलबाद झाला. ग्लेन मॅक्सवेल व कॅमेरून ग्रीन यांच्यावर आता धावांचा डोंगर उभा करण्याची जबाबदारी होती आणि मॅक्सवेलने खणखणीत चौकार मारून त्याचे खाते उघडले. पण, २२ धावांची ही भागीदारी नेदरलँड्सच्या खेळाडूने चपळ क्षेत्ररक्षण करून तोडली. ग्रीन ८ धावांवर रन आऊट झाला. मॅक्सवेलने २८ चेंडूंत अर्धशतक, तर ४० चेंडूंत शतक ठोकले. वर्ल्ड कप स्पर्धेतील हे सर्वात वेगवान शतक ठरले. याच वर्ल्ड कपमध्ये एडन मार्करामने ४९ चेंडूंत श्रीलंकेविरुद्ध हा विक्रम केला होता.
मॅक्सवेलने सातव्या विकेटसाठी पॅट कमिन्ससह ४४ चेंडूंत १०३ धावांची भागीदारी केली. मॅक्सवेल ४४ चेंडूंत ९ चौकार व ८ षटकारांसह १०६ धावांवर झेलबाद झाला. व्हॅन बीकने सलग दोन चेंडूंवर मॅक्सवेल व मिचेल स्टार्क यांना माघारी पाठवले. ऑस्ट्रेलियाच्या ५० षटकांत ८ बाद ३९९ धावा झाल्या.