ICC ODI World Cup AUS vs NED Live : दिल्लीचे अरुण जेटली स्टेडियम आज ग्लेन मॅक्सवेलच्या ( Glenn Maxwell) आतषबाजीने दणाणून सोडले. डेव्हिड वॉर्नरने शतक झळकावून सेट केलेला टेम्पो मॅक्सवेलने उंच नेला... त्याने नेदरलँड्सच्या गोलंदाजांना हैराण केले. याला नेमका चेंडू टाकायचा तरी कसा असा प्रश्न त्यांना पडला... बाऊन्सवर अपरकट, पूल... यॉर्करवर स्ट्रेट ड्राईव्ह, बाहेर जाणारा चेंडू विचारूच नका... त्यात मध्येत स्विच हिट... भात्यातील सर्व फटके आज मॅक्सवेलने डच गोलंदाजांसाठी राखून ठेवले होते... त्याने वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात वेगवान शतक त्याने आज झळकावले.
वॉर्नर व स्टीव्ह स्मिथ ( ७१) या अनुभवी जोडीने ११८ चेंडूंत १३२ धावांची भागीदारी केली. मार्नस लाबुशेनने ( ६२) वॉर्नरसोबत ८४ धावा जोडल्या. वॉर्नरने वर्ल्ड कप स्पर्धेतील सहावे शतक झळकावताना सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. वॉर्नर ९३ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह १०४ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर मॅक्सवेलचे वादळ घोंगावले. त्याने ४४ चेंडूंत १०६ धावा चोपल्या. त्यात ९ चौकार व ८ षटकारासह ८४ धावा ८४ चेंडूंतच त्याने चोपल्या.
वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतकवीरांमध्ये मॅक्सवेल चौथ्या क्रमांकावर आलाय. एबी डिव्हिडिलयर्स ( ३१ चेंडू वि. वेस्ट इंडिज, २०१५), कोरी अँडरसन ( ३६ चेंडू वि. वेस्ट इंडिज, २०१४) आणि शाहिद आफ्रिदी ( ३७ चेंडू वि. श्रीलंका, १९९६) हे आघाडीवर आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत मात्र मॅक्सवेलने ४० चेंडूंत शतक ठोकून सर्वात वेगवान सेन्च्युरीचा विक्रम नावावर केला. एडन मार्करामने याच वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध ४९ चेंडूंत शतक झळकावले होते.