ICC ODI World Cup AUS vs NZ Live : धर्मशाला स्टेडियमवर आज चाहत्यांना क्रिकेटचा मनमुराद आस्वाद लुटता आला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३८८ धावांचा डोंगर उभा केला. यानंतर ही मॅच एकतर्फी होईल असाच अंदाज होता, पण समोर न्यूझीलंडचा संघ असताना सर्व अंदाज चुकतात हे खरंय... पहिल्या १० षटकांत दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतरही किवींनी जबरदस्त संघर्ष केला. रचिन रवींद्रच्या शतकाने ऑस्ट्रेलियाला तव्यावर ठेवले होते. त्याने कागांरूंच्या हातातून मॅच खेचून आणलीच होती. पण, सूर गवसलेला ऑस्ट्रेलियन सहजासहजी हार मानणारा नव्हता आणि त्यांनी सामना खेचून आणला.
सचिन तेंडुलकरनंतर फक्त रचिन रवींद्र.... वन डे वर्ल्ड कपमधील असा पराक्रम या दोघांच्या नावावर
ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडने तोडीततोड उत्तर दिले. डेव्हॉन कॉनवे ( २८) व विल यंग ( ३२) यांनी पहिल्या विकेटसाठी ७.२ षटकांत ६१ धावा चोपल्या. या दोघांना जोश हेझलवूडने माघारी पाठवले. न्यूझीलंडने १० षटकांत ७३ धावांवर दोन्ही सलामीवीर गमावले. पण, डॅरील मिचेल ( ५४) आणि रचिन रवींद्र यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी करून संघर्ष सुरू ठेवला होता. रवींद्र आणि कर्णधार टॉम लॅथम ( २१) यांनी ४३ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी केली. रवींद्रने तुफान फटकेबाजी करून ७७ चेंडूंत वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसरे शतक पूर्ण केले. पुढच्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलने स्वतःच्याच गोलंदाजीवर रवींद्रचा सोपा झेल टाकला. पण, ग्लेन फिलिप्सला ( १२) बाद करण्यात मॅक्सवेल यशस्वी ठरला. न्यूझीलंडला विजयासाठी ६० चेंडूंत ९७ धावांची गरज असताना पॅट कमिन्सने मोठी विकेट मिळवून दिली. रवींद्र ८९ चेंडूंत ९ चौकार व ५ षटकारांसह ११६ धावांवर सीमारेशेवर लाबुशेनच्या हाती झेल देऊन परतला. मिचेल सँटनरही ( १२) झम्पाच्या गोलंदाजीवर आऊट झाला. मॅट हेन्री आणि जिमी निशॅम यांच्यावर मदार होती. हेन्रीला ९ धावांवर कमिन्सने माघारी पाठवले. निशॅम उभा राहिला आणि त्याचे फटके पाहून ऑसी चाहत्यांचं टेंशन वाढलं. १२ चेंडूंत ३२ धावा किवींना करायच्या होत्या आणि ट्रेंट बोल्टचा झेल घेताना लाबुशेन सीमारेषेला चिकटला अन् षटकार मिळाला. निशॅमने पुढे फटके खेचून ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि मॅच ६ चेंडूंत १९ धावा अशी जवळ आणली.