ICC ODI World Cup AUS vs NZ Live : आयसीसी स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाची दादागिरी दिसली आहे.. यंदाच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांची सुरुवात अडखळत झाली असली तरी त्यांना सूर गवसला आहे आणि आता त्यांना रोखणे अवघड झाले आहे. ऑस्ट्रेलियाने आज धर्मशाला येथे त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी न्यूझीलंडविरुद्ध तुफान फटकेबाजी केलेली पाहायला मिळतेय. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला अन् डेव्हिड वॉर्नर व ट्रॅव्हिस हेड यांनी त्यांना चांगलेच चोपून काढले. दुखापतीतून सावरून पुनरागमन करणाऱ्या हेडने यंदाच्या वर्ल्ड कपमधील वेगवान अर्धशतकाचा विक्रम आज केला. तेच वॉर्नरसोबत त्याने चौकार-षटकारांची आतषबाजी केली. फक्त १ धावेने वर्ल्ड कप स्पर्धेतील वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवण्याची त्यांची संधी हुकली.
ऑस्ट्रेलियाची फॉर्मात असलेली जोडी अखेर मैदानावर एकत्रित दिसली. ट्रॅव्हिस हेडला दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यांत खेळता आले नव्हते, परंतु आज त्याचे पुनरागमन दणक्यात झाले. पहिल्या षटकापासून हेड व वॉर्नर यांनी चेंडूला सीमापार पाठवण्याचा सपाटा लावला... धर्मशालाच्या मैदानावर जणून षटकारांचा पाऊस पडत असल्याचा अनुभव चाहत्यांना आला. किवी गोलंदाजांना नक्की गोलंदाजी करावी तर कशी असा प्रश्न पडला. इतक्या सहजतेने हे दोघं चेंडूला सीमेच्या दिशेने पाठवत होते. वॉर्नरने २८ चेंडूंत अर्धशतक झळकावल्यानंतर हेडनेही कमाल केली. त्याने २५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील हे वेगवान अर्धशतक ठरले. त्याने कुसल मेंडिसच्या ( वि. दक्षिण आफ्रिका) विक्रमाशी आज बरोबरी केली. ऑस्ट्रेलियाकडून वर्ल्ड कप स्पर्धेतील हे दुसरे वेगवान अर्धशतक ठरले. २०१५ मध्ये ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्ध २१ चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. वॉर्नरने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये १३९१* धावांसह विराट कोहलीला ( १३८४) मागे टाकले.