ICC ODI World Cup AUS vs NZ Live : ३८८ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर न्यूझीलंडकडून असे प्रत्युत्तर मिळेल असा अंदाज ऑस्ट्रेलियालाही आला नसावा. रचिन रविंद्र ( Rachin Ravindra ) याच्या शतकाने कांगारूंना भांबावून सोडले आहे. त्याने ७७ चेंडूंत शतक झळकावले आणि सचिन तेंडुलकरनंतर एक मोठा पराक्रम करणारा जगातला पहिल्याच फलंदाजाचा मान पटकावला. धर्मशालाच्या मैदानावर रचिन रचिन नावाचा जयघोष पाहायला मिळाला.
न्यूझीलंडकडून तोडीततोड उत्तर पाहायला मिळाले. डेव्हॉन कॉनवे ( २८) व विल यंग ( ३२) यांनी पहिल्या विकेटसाठी ७.२ षटकांत ६१ धावा चोपल्या. या दोघांना जोश हेझलवूडने माघारी पाठवले. न्यूझीलंडने १० षटकांत ७३ धावांवर दोन्ही सलामीवीर गमावले. पण, डॅरील मिचेल आणि रचिन रवींद्र यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी करून किवींसाठी संघर्ष सुरू ठेवला होता. मिचेल ५१ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५४ धावांवर झम्पाच्या गोलंदाजीवर बाद झाला. रवींद्र आणि कर्णधार टॉम लॅथम यांनी ४३ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी केली. अॅडम झम्पाने ही भागीदारी तोडली आणि लॅथम २१ धावांवर बाद झाला. रवींद्रने तुफान फटकेबाजी करून ७७ चेंडूंत वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसरे शतक पूर्ण केले. पुढच्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलने स्वतःच्याच गोलंदाजीवर रवींद्रचा सोपा झेल टाकला. पण, ग्लेन फिलिप्सला ( १२) बाद करण्यात मॅक्सवेल यशस्वी ठरला.
२६ वर्षांच्या आत वर्ल्ड कप स्पर्धेत दोन शतक झळकावणारा रचिन रवींद्र हा दुसरा फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकरने आधी हा पराक्रम केला होता. न्यूझीलंडकडून वर्ल्ड कपच्या एकाच पर्वात दोन शतक झळकावणारा रचिन हा चौथा फलंदाज ठरला. यापूर्वी ग्लेन टर्नर ( १९७५), मार्टीन गुप्तिल ( २०१५), केन विलियम्सन ( २०१९) यांनी हा पराक्रम केला आहे. न्यूझीलंडकडून वर्ल्ड कप स्पर्धेत शतक झळकावणारा तो युवा फलंदाज ठरला आहे. त्याने २३ वर्ष व ३२१ दिवसांचा असताना आधी इंग्लंडविरुद्ध आणि आज २३ वर्ष व ३४४ दिवसांचा असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकले.