Join us  

Australia in Final : भारत-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप फायनल! दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरले 'चोकर्स'

ICC ODI World Cup AUS vs SA Semi Final Live : दोन पराभवांनी वर्ल्ड कपची सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने अचंबित करणारी झेप घेतली अन् थेट फायनलमध्ये एन्ट्री मारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 10:06 PM

Open in App

ICC ODI World Cup AUS vs SA Semi Final Live : दोन पराभवांनी वर्ल्ड कपची सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने अचंबित करणारी झेप घेतली अन् थेट फायनलमध्ये एन्ट्री मारली. २१२ धावांचा बचाव करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनेही जीवाचे रान केले, परंतु ऑस्ट्रेलियन्सच्या चिकाटीसमोर ते फेल गेले. ट्रॅव्हिस हेड व डेव्हिड वॉर्नर यांच्या आक्रमक सुरुवातीनंतरही आफ्रिकन फिरकीपटूंनी सामन्यात रंगत आणली होती. पण, चोकर्स हा बसलेला ठप्पा पुन्हा एकदा अधोरेखित झाला. ऑस्ट्रेलिया आठव्यांदा वर्ल्ड कप फायनल खेळणार आहेत. १९ नोव्हेंबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-ऑस्ट्रेलिया फायनल ( India vs Australia Final) होईल.

 दक्षिण आफ्रिकेच्या 'फिरकी'ने ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले, ५ पैकी तिघांचे त्रिफळे उडवले; Video 

डेव्हिड वॉर्नर व ट्रॅव्हिस हेड या दोघांनी ३८ चेंडूंवर ६० धावा चोपल्या होत्या. पण, एडन मार्करमने त्याच्या पहिल्याच षटकात वॉर्नरचा ( २९) त्रिफळा उडवला. कागिसो रबाडाच्या षटकात मिचेल मार्शचा ( ०)  रॅसी व्हॅन डेर ड्युसेनने अविश्वसनीय झेल घेतला. त्यानंतर आफ्रिकेने फिरकीपटूंचा मारा सुरू केला. तब्रेझ शम्सीच्या पहिल्याच षटकात स्टीव्ह स्मिथ व हेड यांना जीवदान मिळाले. झेल थोडे अवघड होते, परंतु ते घेता आले असते. केशव महाराजने त्याच्या पहिल्याच षटकात हेडचा ( ६२) त्रिफळा उडवला. स्मिथ व मार्नस लाबुशेन यांनाही डाव सावरण्यात अपयश आले आणि शम्सीने २२व्या षटकात लाबुशेनची ( १८) विकेट मिळवली. शम्सीने ऑस्ट्रेलियाचा महत्त्वाचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचा ( १) त्रिफळा उडवल्याने  १३७ धावांत ऑसींचा निम्मा संघ माघारी परतला होता. 

स्मिथ व जॉश इंग्लिस यांनी संयमी खेळ सुरू ठेवला होता, परंतु एक प्रसंग असा घडला की त्यांच्यातला ताळमेळ चुकला. नशिबाने आफ्रिकेला रन आऊट करता आले नाही. विजयासाठी ३९ धावांची गरज असताना गेराल्ड कोएत्झीने ऑसींना मोठा दणका दिला. स्मिथची ६२ चेंडूवरील ३० धावांची संयमी खेळी आणि इंग्लिससोबत ३७ धावांची भागीदारी संपुष्टात आली. २० धावा हव्या असताना कोएत्झीने ४९ चेंडूंत २८ धावा करणाऱ्या इंग्लिसचा त्रिफळा उडवला. क्विंटनकडून पॅट कमिन्सचा झेल सुटला अन् सामन्याला वळण येता येता वाचले. मिचेल स्टार्क ( १६)  व कमिन्स ( १४) यांनी संयमी खेळ ( ४६ चेंडूंत २२ धावा) करताना मॅच संपवली. २००७ व २०१५ नंतर आफ्रिका पुन्हा उपांत्य फेरीतच बाहेर पडला. ऑस्ट्रेलियाने ४७.२ षटकांत ७ बाद २१५ धावा केल्या.

तत्पूर्वी, मिचेल स्टार्क व जोश हेझलवूड यांनी सुरुवातीच्या षटकांत प्रत्येकी २ विकेट्स घेत आफ्रिकेची अवस्था ४ बाद २४ अशी दयनीय केली होती. डेव्हिड मिलर आणि हेनरिच क्लासेन ( ४८) या जोडीने  ९५ धावांची भागीदारी केली.  ट्रॅव्हिस हेडने क्लासेनचा त्रिफळा उडवला आणि पाठोपाठ त्याने मार्को यान्सेनलाही ( ०) माघारी पाठवले. मिलर व गेराल्ड कोएत्झी ( १९) यांची ५३ धावांची भागीदारी पॅट कमिन्सने तोडली. अखेरच्या षटकांत धावा वाढवण्याच्या प्रयत्नात  ११६ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह १०१ धावांवर बाद झाला. आफ्रिकेचा संपूर्ण संघ ४९.४ षटकांत २१२ धावांवर माघारी परतला.   

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपआॅस्ट्रेलियाद. आफ्रिका