ICC ODI World Cup AUS vs SA Semi Final Live : डेव्हिड वॉर्नर व ट्रॅव्हिस हेड या दोघांनी जी सुरुवात करून दिली. या दोघांची ३८ चेंडूंवर ६० धावांची भागीदारी एडन मार्करमने तोडली. आपल्या पहिल्याच षटकात मार्करमने चेंडू अप्रतिम वळवला अन् वॉर्नरचा ( २९) त्रिफळा उडवला. या विकेटनंतर आफ्रिकेच्या ताफ्यात चैतन्य संचारले... कागिसो रबाडाच्या षटकात मिचेल मार्शने कव्हरच्या दिशेने खणखणीत फटका मारला, पंरतु रॅसी व्हॅन डेर ड्युसेनने तितक्याच चपळाईने हवेत झेप घेत झेल टिपला. मार्श भोपळ्यावर माघारी परतला. पण, हेडने चोप देताना अर्धशतक झळकावले. हेडचा अविश्वसनीय झेल घेण्याचा रिझा हेंड्रीक्सचा प्रयत्न थोडक्यात अयशस्वी ठरला.
तब्रेझ शम्सीच्या पहिल्याच षटकात स्टीव्ह स्मिथ व हेड यांना जीवदान मिळाले. झेल थोडे अवघड होते, परंतु ते घेता आले असते. पण, केशव महाराजने त्याच्या पहिल्याच षटकात हेडचा त्रिफळा उडवला. त्याने ४८ चेडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ६२ धावा केल्या. स्मिथ व मार्नस लाबुशेन यांनाही डाव सावरण्यात अपयश आले आणि शम्सीने २२व्या षटकात लाबुशेनची ( १८) विकेट मिळवली. शम्सीने ऑस्ट्रेलियाचा महत्त्वाचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचा ( १) काटा काढला. ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ १३७ धावांत तंबूत परतला.