Join us  

मिचेल मार्शच्या नाबाद १७७ धावा, ऑस्ट्रेलियाने सहज जिंकला सामना; स्मिथ, वॉर्नर यांची फिफ्टी

ICC ODI World Cup BAN vs AUS Live : ऑस्ट्रेलियाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 6:09 PM

Open in App

ICC ODI World Cup BAN vs AUS Live : ऑस्ट्रेलियाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयी मालिका कायम राखताना साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला. मिचेल मार्शच्या नाबाद १७७ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्स राखून हा सामना जिंकला. गुरुवारी त्यांच्यासमोर उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डनवर ही मॅच होईल.

तोवहिद हृदोयचे अर्धशतक अन् कर्णधार नमजूल होसैन शांतो यांच्या फटकेबाजीने बांगलादेशने तीनशेपार धावा उभ्या केल्या. तनझिज हसन ( ३६), लिटन दास ( ३६) यांनी ११ षटकांत ७६ धावा उभ्या केल्या.  नजमूल ४५ धावांवर बाद झाला, तर हृदोय ७९ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ७४ धावांवर माघारी परतला. महमुदुल्लाह ( ३२), मुश्फीकर रहिम ( २१) व मेहीदी हसन मिराझ ( २९) यांनी छोटेखानी योगदान दिले. पण, त्यांना अखेरच्या १० षटकांत केवळ ६७ धावाच करता आल्या. बांगलादेशने ५० षटकांत ८ बाद ३०६ धावा केल्या. एबॉट व झम्पा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. 

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हीस हेड ( १०) तिसऱ्या षटकात त्रिफळाचीत झाला. डेव्हिड वॉ़र्नर आणि मिचेल मार्श यांनी १२० धावांची भागीदारी केली. वॉर्नरने ६१ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या, परंतु या वर्ल्ड कपमध्ये ५०० धावा गाठण्यासाठी त्याला १ धाव कमी पडली. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८००० धावा करणारा तो ख्रिस गेल व सनथ जयसूर्या यांच्यानंतर तिसरा सलामीवीर ठरला. मिचेल मार्शने शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला विजयाच्या दिशेने कूच करून दिली. मार्शे १३२ चेंडूंत १७ चौकार व ९ षटकारांच्या मदतीने नाबाद १७७ धावा केल्या, तर स्टीव्ह स्मिथने ६४ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार खेचून नाबाद ६३ धावा केल्या. दोघांनी १३५ चेंडूंत १७५ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला ४४.४ षटकांत विजय मिळवून दिला.   

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपआॅस्ट्रेलियाबांगलादेश