ICC ODI World Cup ENG vs SL Live : गतविजेत्या इंग्लंडची अवस्था फारच वाईट झालीय... वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत इतरांच्या कृपेने ते गुणतालिकेत मागील काही दिवसांत वर सरकलेत.. पण, त्यांना स्पर्धेत टीकून राहाण्यासाठी स्वकर्तुत्वही गरजेचे आहे. ४ सामन्यांत ३ पराभवानंतर त्यांच्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे आणि तरीही ते अजूनही झोपेतून जागे झालेले नाही. तेच याच कात्रित अडकलेल्या श्रीलंकेने मात्र आज कमाल करून दाखवली. इंग्लंडचा संपूर्ण संघ १५६ धावांवर गुंडाळून त्यांनी स्वतःला स्पर्धेत कायम राखण्याची धडपड दाखवली आहे. त्यात यष्टिरक्षक कुसल मेंडिसने मिळवून दिलेली एक विकेट अविश्वसनीय होती.
इंग्लंडच्या लाजीरवाण्या कामगिरीचा टीम इंडियाला फायदा झाला, जाणून घ्या कसा
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बेन स्टोक्स हा त्यांच्याकडून सर्वाधिक ४३ ( ७३ चेंडू) धावा करणारा खेळाडू ठरला. जॉनी बेअरस्टो ( ३०) व डेविड मलान ( २८) यांनी सुरुवात चांगली केली होती. पण, त्यानंतर लाईन लागली. मोईन अली ( १५) व डेव्हिड विली ( १४) यांनीही दुहेरी आकडा गाठला, परंतु तो संघासाठी पुरेसा नाही ठरला. लाहिरु कुमारा ( ३-३५), कसून रजिथा ( २-३६), पुनरागमन करणारा अँजेलो मॅथ्यूज ( २-१४) आणि महीश थीक्षणा ( १-२१) यांनी सुरेख गोलंदाजी केली. बिनबाद ४५ वरून इंग्लंडचा संपूर्ण संघ ३३.२ षटकांत १५६ धावांत तंबूत परतला. १११ धावांत इंग्लंडने १० गडी गमावले.