ICC ODI World Cup ENG vs SL Live : आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत गतविजेत्यांची अवस्था इतकी वाईट कधीच झाली नव्हती. इंग्लंडने आज आणखी एक लाजीरवाणा पराभव पत्करला आणि त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. इंग्लंड आणि श्रीलंका हे दोन्ही संघ बुडणाऱ्या नावेवर प्रवास करत होते, परंतु आज श्रीलंकेने वरचढ खेळ करून इंग्लंडचे पॅकअप केले. ५ सामन्यांतील हा त्यांचा चौथा पराभव ठरला. श्रीलंकेने १९९९ पासून सुरू असलेली परंपरा कायम राखली. इंग्लंडला वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांनी मागील २४ वर्षात विजय मिळवू दिलेला नाही. इंग्लंडने ९९च्या वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेला शेवटचं पराभूत केलं होतं.
वाह रे पठ्ठ्या! Wide बॉलवर प्रसंगावधान दाखवून मिळवली विकेट; इंग्लंड चकित, Video
माफक लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकाही डगमगली. कुसल परेरा ( ४) व कुसल मेंडिस ( ११) हे डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर बाद झाले. पण, त्यानंतर सदीरा समरविक्रमा आणि पथूम निसंका यांनी तिसऱ्या विकेटसाठी डाव सावरला. या दोघांनी आक्रमक फटकेबाजी करून इंग्लंडच्या मनोबलाचे खच्चीकरण केले. निसंक व समरविक्रमा या दोघांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करताना तिसऱ्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण शतकी भागीदारीही पूर्ण केली. या दोघांनी २६ षटकांत मॅच संपवली आणि श्रीलंकेने २५.४ षटकांत २ बाद १६० धावा केल्या. समरविक्रमा ५४ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ६५ धावांवर नाबाद राहिला. निसंका ८३ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ७७ धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, बेन स्टोक्सने सर्वाधिक ४३ ( ७३ चेंडू) धावा केल्या. जॉनी बेअरस्टो ( ३०) व डेविड मलान ( २८) यांनी सुरुवात चांगली केली होती. पण, त्यानंतर लाईन लागली. मोईन अली ( १५) व डेव्हिड विली ( १४) यांनीही दुहेरी आकडा गाठला, परंतु तो संघासाठी पुरेसा नाही ठरला. लाहिरु कुमारा ( ३-३५), कसून रजिथा ( २-३६), पुनरागमन करणारा अँजेलो मॅथ्यूज ( २-१४) आणि महीश थीक्षणा ( १-२१) यांनी सुरेख गोलंदाजी केली. बिनबाद ४५ वरून इंग्लंडचा संपूर्ण संघ ३३.२ षटकांत १५६ धावांत तंबूत परतला. १११ धावांत इंग्लंडने १० गडी गमावले.
( इंग्लंडच्या समर्थकाची अवस्था )
उपांत्य फेरीचे समीकरण...
भारतीय संघ ५ विजय व १० गुणांसह आघाडीवर आहे. दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड प्रत्येकी ८ गुणांसह आणि ऑस्ट्रेलिया ६ गुणांसह टॉप फोअरमध्ये आहे. आजपर्यंत सर्वच संघांचे ५ सामने झाले आहेत. पाकिस्तान, अफगाणिस्तान व श्रीलंका हे ४ गुणांसह अजूनही शर्यतीत आहेत. इंग्लंड, बांगलादेश व नेदरलँड्स यांना ५ पैकी १ सामना जिंकता आल्याने त्यांचे आव्हान संपल्यात जमा आहे. आता ते इतरांचे गणित बिघडवण्याचे काम करू शकतात. इंग्लंडला पुढील ४ सामन्यांत भारत, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स व पाकिस्तान यांचा सामना करायचा आहे.
Web Title: ICC ODI World Cup ENG vs SL Live : Defending champions england out from Semi final race, Sri lanka beat them by 8 wickets, check Semi Final Scenario
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.