Join us  

सुरक्षा यंत्रणेला गंडवले! विराटला मिठी मारण्यासाठी चाहता मैदानावर, टी-शर्टवरील मॅसेजने वेधले लक्ष

ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : रोहित शर्माने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील दबदबा फायनलमध्येही कायम राखताना भारताला आक्रमक सुरुवात करून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 3:16 PM

Open in App

ICC ODI World Cup Final IND vs AUS Live : रोहित शर्माने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील दबदबा फायनलमध्येही कायम राखताना भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. शुबमन गिल आज दबावाला बळी पडला अन् ४ धावांवर झेल देऊन माघारी परतला. पण, रोहितने दुसऱ्या विकेटसाठी विराटसह ३२ चेंडूंत ४६ धावा जोडल्या. ग्लेन मॅक्सवेलने दाखवलेल्या आमीषाला रोहित बळी पडला. मॅक्सवेलच्या पहिल्या षटकात सिक्स-फोअऱ मारल्यानंतर रोहित पुन्हा मोठा फटका मारेल हे मॅक्सवेलने हेरले अन् किंचित आखूड व वळणारा चेंडू टाकला. रोहितने पुढे येऊन फटका मारला अन् ट्रॅव्हिस हेडने परतीचा अविश्वसनीय झेल घेतला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर स्मशान शांतता पसरली. त्यात पॅट कमिन्सने भारताला आणखी एक धक्का देताना श्रेयस अय्यरला ( ४) झेलबाद केले. ५ चेंडूंत भारताचे दोन फलंदाज माघारी पाठवून ऑस्ट्रेलियाने मुसंडी मारली.

विक्रमवीर रोहित शर्मा बाद, स्टेडियमवर सन्नाटा! मॅक्सवेलची गुगली, ट्रॅव्हिस हेडचा अविश्वसनीय झेल

रोहित एकाच वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक ५८२ धावा करणारा कर्णधार ठरला. त्याने केन विलियम्सनचा ( २०१९) ५७८ धावांचा विक्रम मोडला. रोहित ३१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकाराने ४७ धावा केल्या. शुबमनसह त्याने  २०२३ कॅलेंडर वर्षात वन डे क्रिकेटमध्ये १५२३ धावांची भागीदारी केली. भारताकडून ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. १९९८मध्ये सचिन व गांगुली यांनी १६३५ धावा केल्या होत्या. विराट व लोकेश राहुल यांनी टीम इंडियाचा डाव सावरला आहे आणि भारताने फलकावर शतकी धावा चढवल्या आहेत. या हायव्होल्टेज सामन्यासाठी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पाखरूही पंख मारू शकत नाही असे बोलले जात असताना एक फॅन सुरक्षा कर्मचाऱ्यांना चकवून विराटला मिठी मारण्यासाठी खेळपट्टीच्या मधोमध आला. 

त्याच्या टी शर्टवरील मॅसेजने सर्वांचे लक्ष वेधले. पॅलेस्टाईनला सपोर्ट करण्याचा मॅसेज चाहत्याच्या टी शर्टवर लिहिले होते. पोलिसांनी त्याला अटक केली.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपविराट कोहलीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाऑफ द फिल्ड