अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघ २००३च्या पराभवाची परतफेड करेल अशी भारतीयांची अपेक्षा फोल ठरली. टीम इंडिया जेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून हरली. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी २४१ धावांचे लक्ष्य दिले होते, हे लक्ष्य ऑस्ट्रलिया संघाने ४३ षटकात पूर्ण केले. ऑस्ट्रेलियन संघ ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये सहाव्यांदा चॅम्पियन बनला आहे.
'हेड'ने कोट्यवधी 'हृदयं' तोडली; भारताचं स्वप्न भंगलं, ऑस्ट्रेलियाने जग जिंकलं!
क्रिकेट विश्वचषक विजेतेपद पटकावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघावर पैशांचा पाऊस पडत आहे. विजेत्या संघ ऑस्ट्रेलियाला बक्षीस म्हणून ४० लाख डॉलर म्हणजेच सुमारे ३३.३३ कोटी रुपये मिळाले आहेत. उपविजेत्या टीम इंडियाला बक्षिसाची रक्कमही चांगली मिळाली. भारताला उपविजेते म्हणून २० लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे १६.६५ कोटी रुपये मिळाले आहेत. याशिवाय या दोन्ही संघांना साखळी टप्प्यातील सामने खेळण्यासाठी पैसेही मिळाले.
क्रिकेट विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच आयसीसीने बक्षिसाची रक्कम जाहीर केली होती. विश्वचषक स्पर्धेसाठी एकूण १० मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे ८३.२९ कोटी रुपये बक्षीस रक्कम निश्चित करण्यात आली होती, जी सर्व १० संघांमध्ये वेगवेगळी वाटली जाणार होती. त्यानुसार क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला ४ मिलियन डॉलर्स, उपविजेत्या संघाला २ मिलियन डॉलर्स मिळणार होते. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन्ही संघांना प्रत्येकी ८ लाख डॉलर देण्याची तरतूद होती. तर ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक विजयासाठी ३३.३१ लाख रुपयांची बक्षीस रक्कम निश्चित करण्यात आली होती.
क्रिकेट विश्वचषक पुरस्काराची रक्कम
विश्वचषक विजेता: सुमारे ३३ कोटी रुपये (ऑस्ट्रेलिया)
विश्वचषक उपविजेता: १६.६५ कोटी (भारत)
उपांत्य फेरी- ६.६६ कोटी (दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड)
ग्रुप स्टेज मधील प्रत्येक विजेत्या संघाला ३३.३१ लाख रुपये.
टीम इंडियाला मिळाले एवढे बक्षीस
टीम इंडियाला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी २० लाख डॉलर्स मिळाले. तसेच लीग स्टेजमध्ये टीम इंडियाने सर्व १० सामने जिंकले होते, यामुळे त्यांना चार लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे ३.३३ कोटी रुपये बक्षीस रक्कम देखील मिळाली होती. म्हणजेच या विश्वचषकात भारताला एकूण २४ लाख डॉलर्स सुमारे २० कोटी रुपये आहेत.