- स्वदेश घाणेकर
भारतीय संघाची वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पुन्हा लांबणीवर पडले आहे... २०११ नंतर भारताला वन डे वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. भारतात झालेल्या २०२३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ सलग १० सामने जिंकून फायनलमध्ये पोहोचला होता... मागील दोन वर्ल्ड कप स्पर्धा पाहता यजमान संघाने बाजी मारल्याचा इतिहास सोबतिला असल्याने यंदाही आपणच जिंकू ही भावना मनात घट्ट बसली होती. २००३ आणि २०२३ चे बरेच योगायोग हे भारतीय संघाच्या बाजूने होते... २००३मध्ये ऑस्ट्रेलियाने बाजी मारलेली आणि तेव्हा त्यांच्यासाठी योग्य ठरलेली आकडेवारी यंदा भारताच्या बाजूने होती. त्यात नाणेफेक जिंकून पॅट कमिन्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. २००३ मध्ये गांगुलीने असाच निर्णय घेतलेला आणि पुढे काय झाले ते सर्वांनी पाहिले. तसेच आज ऑस्ट्रेलियाचे होईल असे वाटलेले, पण चक्र उलटे फिरले..
नेमकं काय घडलं...ऑस्ट्रेलिया हा आयसीसी स्पर्धेतील संघ आहे, हे उगाच म्हटले जात नाही. या स्पर्धेच्या सुरुवातीच्या दोन सामन्यांत मार खाल्ल्यानंतर ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत पोहचणार नाही असाच अंदाज होता. पण, ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्ध केलल्या द्विशतकाने चक्र फिरवले. एक बाद फेरीत गेल्यावर ऑसी हे किती डेंजर आहेत हे उपांत्य फेरीत दिसले आणि आजही... काल स्टेडियमवर आल्यानंतर दोन्ही संघांनी खेळपट्टीची पाहणी केली. पॅट कमिन्सने खेळपट्टीचे फोटो काढले आणि अभ्यासाला बसला..
नाणेफेक जिंकल्यानंतर त्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर लोकांनी त्याला मुर्ख ठरवले. त्यात रोहितने दिलेला मार पाहून ऑसी गोंधळले. पण, खेळाडूंनी संयम राखला... गिल व अय्यरची विकेट मिळवल्यानंतर गोलंदाजांनी भारताला एकेका धावेसाठी तरसवले. विराट व लोकेश खेळपट्टीवर असूनही ९७ चेंडूंत या दोघांना चौकार मारता आला नव्हता. ऑस्ट्रेलियाचे क्षेत्ररक्षण हे आज उल्लेखनीय झाले.. भारताच्या जवळपास ४०-५० धावा त्यांनी रोखल्या आणि हे खरं त्यांच्या यशाचे रहस्य ठरले. ११ ते ४० षटकांत भारतीय फलंदाजांना केवळ २ चौकार मारता आले. ऑस्ट्रेलियन्स भारताच्या सर्व फलंदाजांचा अभ्यास करून उतरेल आणि ठरलेली रणनीती त्यांनी योग्य अमलात आणली. २४० धावा या आव्हानात्मक असल्याचे मिचेल स्टार्कने कबूल केले होते.
पण, ऑस्ट्रेलियन्स आयसीसी स्पर्धेसाठीच्या तयारीच्या भट्टीत शेकून आलेले असतात... त्यामुळे वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या वन डे मालिकेत भारताकडून झालेली हात त्यांच्यासाठी फार महत्त्वाची नव्हती. ते प्रत्येक सामन्यात शून्यातून सुरुवात करतात. वॉर्नर, स्मिथ, मार्श माघारी परतल्यानंतर हेड व लाबुशेन खेळपट्टीवर उभे राहिले आणि इथे भारतीय गोलंदाजांचा समंय ढासळला. या दोघांनी जोखिमभरे फटके खेळले नाही आणि समालोचन करणाऱ्या रवी शास्त्री यांनीही त्यांचे कौतुक केले. शतकानंतर हेडने हात मोकळे केले आणि जिथे लूझ बॉल मिळाला तो सीमापार पाठवला...
भारतीय संघाचे आज काहीच चुकले नाही, फक्त दिवस ऑस्ट्रेलियाचा होता. भारतीय संघाने १४० कोटी भारतीयांना अभिमान वाटावा अशीच कामगिरी संपूर्ण स्पर्धेत केली आहे आणि त्याचा गर्व बाळगायला हवा.