Join us  

IND vs PAK लढतीपूर्वी भारताचा World Cup स्पर्धेत 'सर्जिकल स्ट्राईक', पाकिस्तानच्या जिव्हारी लागणारी कामगिरी

ICC ODI World Cup GROUP STAGE POINT TABLE: भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 9:26 PM

Open in App

ICC ODI World Cup GROUP STAGE POINT TABLE : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. अफगाणिस्तानने ठेवलेले २७३ धावांचे लक्ष्य भारताने ८ विकेट्स व १५ षटकं हातची राखून पार केले. २७०+ धावांचे लक्ष्य सर्वात कमी षटकांत पार करण्याचा विक्रम भारताने नावावर केला. यापूर्वी २०१६मध्ये दक्षिण आफ्रिकेने ३६.२ षटकांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध २९५ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. रोहित शर्माने ८४ चेंडूंत १६ चौकार व ५ उत्तुंग षटकारांच्या आतषबाजीसह १३१ धावा कुटल्या आणि त्याच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले गेले. भारतीय संघाचा पुढील सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्घ होणार आहे आणि त्याआधीच भारताने शेजाऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक केला आहे.

रोहित व इशान किशन ( ४७) यांनी १५६ धावांची सलामी देताना भारताच्या पाया मजबूत केला आणि त्यानंतर विराट कोहलीने घरच्या मैदानावर विजयी कळस चढवला. रोहितने विराटसह ४९ धावा जोडल्या. विराट आणि श्रेयस अय्यर यांनी भारताचा विजय निश्चित केला. भारताने ३५ षटकांत २ बाद २७३ धावा करून ८ विकेट्स राखून मॅच जिंकली. विराटने ५६ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ५५ धावा केल्या. श्रेयस २५ धावांवर नाबाद राहिला. अफगाणिस्तानने ८ बाद २७२ धावांचा डोंगर उभा केला होता. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी ( ८०) आणि आझमतुल्लाह ओमारझाई ( ६२) यांनी चांगली फलंदाजी केली. जसप्रीत बुमराहने ३९ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. 

GROUP STAGE POINT TABLEवन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतासह न्यूझीलंड व पाकिस्तान यांनी प्रत्येकी दोन विजय मिळवले आहेत. न्यूझीलंड १.९५८ नेट रन रेटसह अव्वल स्थानावर आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर होता आणि पाकिस्तान दुसऱ्या... पण, आता भारतीय संघ १.५०० अशा नेट रन रेटसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे आणि पाकिस्तानला ( ०.९२७) तिसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे. दक्षिण आफ्रिका १ विजय व २.०४० नेट रन रेटसह चौथ्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध पाकिस्तानभारतअफगाणिस्तान