ICC ODI World Cup: वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धा ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील ११ वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळवली जाणार आहे. या काळात उत्तर भारतात हलकीशी थंडी राहील आणि दवही पडेल. अशा स्थितीत दिवस-रात्रीच्या सामन्यांमध्ये खेळाडूंना अडचणी येऊ शकतात. हे लक्षात घेऊन आयसीसीने भारतीय खेळपट्टी क्युरेटर्ससाठी नवा आदेश जारी केला आहे, जेणेकरून नाणेफेकीचा सामन्यावर फारसा परिणाम होऊ नये आणि दोन्ही संघांमध्ये बरोबरीचा सामना व्हावा. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात बहुतेक स्टेडियममध्ये जोरदार दव पडण्याची शक्यता आहे.
UAE मध्ये खेळल्या गेलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१ स्पर्धेमध्ये देखील दव मुळे खूप त्रास झाला. भारतीय परिस्थितीत फिरकीपटूंना खूप मदत मिळते. पण, आयसीसीने क्युरेटर्सना सांगितले आहे की, खेळपट्टीवर शक्य तितके गवत ठेवावे जेणेकरून वेगवान गोलंदाजांचा फायदा होईल. टाईम्स ऑफ इंडियाच्या मते, या काळात उत्तर, पश्चिम आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये जोरदार दव पडण्याची शक्यता आहे. चेन्नई आणि बंगळुरूच्या सामन्यांवर हलक्या पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे नाणेफेकीने सामन्यात फारसा फरक पडू नये, अशी आयसीसीची इच्छा आहे. म्हणजेच नाणेफेक जिंकणारा संघच सामना जिंकतो, असे होऊ नये.
बॅट आणि बॉलमध्ये समतोल राखण्यासाठी आयसीसीने प्रत्येक मैदानाची सीमा ( बाऊंड्री) वाढवण्याचे आदेश दिले आहेत. सर्व स्टेडियम्सना सांगण्यात आले आहे की सीमेचा आकार ७० मीटर असावा. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये, सीमारेषेचा किमान आकार ६५ मीटर असतो तर कमाल आकार ८५ मीटर असतो. जुन्या स्टेडियममध्ये सीमारेषा ७० ते ७५ मीटरच्या दरम्यान असते. मात्र आता हद्दीचा आकार ७० मीटरपेक्षा जास्त ठेवावा लागणार आहे.
भारतीय क्रिकेट बोर्डाने खेळपट्टीच्या क्युरेटर्सना मैदानावरील दव कमी करण्यासाठी ड्रायिंग एजंट्स वापरण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. भारताला ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचे असून येथे दव पडण्याची फारशी समस्या राहणार नाही, पण लखनौमध्ये २९ ऑक्टोबरला होणाऱ्या सराव सामन्यात दव त्रास देऊ शकतो. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आर अश्विनला संघात बोलावले आहे आणि त्याचा वर्ल्ड कप स्पर्धेसाठीही विचार केला जाईल अशी चर्चा आहे, पण ICCच्या नियमानुसार खेळपट्टी तयार झाल्यास फिरकीचा प्रभाव कमी होऊ शकतो अशात अश्विनला संघात घेणे योग्य ठरेल का हा आता प्रश्न पडला आहे.