ICC ODI World Cup India vs Afghanistan Live : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. अफगाणिस्तानच्या २७२ धावांच्या प्रत्युत्तरात रोहितने आज आक्रमक पवित्रा अवलंबवला. इशान किशन सावध खेळ करताना दिसला. दिल्लीच्या या स्टेडियमवर २०१३नंतर आतापर्यंत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सहापैकी ५ सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारतासमोर मोठं आव्हान होतं आणि ते रोहितने खांद्यावर उचलले.
भारताला १९८२च्या पराक्रमाच्या पुनरावृत्तीची संधी, अफगाणिस्तानने उभी केलीय विक्रमांची 'दही हंडी'!
अफगाणिस्तानने आज वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध ८ बाद २७२ धावांचा डोंगर उभा केला आहे. ३ बाद ६३ अशी अफगाणिस्तानची अवस्था झाली होती, परंतु अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी ( ८०) आणि आझमतुल्लाह ओमारझाई ( ६२) यांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. मोहम्मद सिराज हा आजच्या सामन्यात सर्वात महागडा गोलंदाज ठरला त्याने ९ षटकांत एकही विकेट न घेता ७६ धावा दिल्या. जसप्रीत बुमराहने ३९ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्याने २ गडी बाद केले. अफगाणिस्तानची वर्ल्ड कप स्पर्धेतील ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. २०१९मध्ये त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध लीड्स येथे २८८ धावा केल्या होत्या.
नवी दिल्लीच्या स्टेडियमवर १९८२ मध्ये भारताने श्रीलंकेविरुद्ध २७८ धावांचे यशस्वी लक्ष्य पार केले होते आणि ही सर्वोत्तम कामगिरी होती. ही कामगिरी वगळता २४०+ धावांच्या लक्ष्याचा इथे एकदाच यशस्वी पाठलाग झाला आहे. १९९६च्या वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेने भारताविरुद्ध २७२ धावांचे लक्ष्य पार केले होते. रोहितने आज वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात जलद १००० धावांच्या भारतीय फलंदाजाचा विक्रम नावावर केला आणि जगातील फलंदाजांमध्ये त्याने संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले.
रोहितने १९ इनिंग्जमध्ये हा पराक्रम करताना डेव्हिड वॉर्नरशी बरोबरी केली. पण, सचिन तेंडुलकर ( २०), एबी डिव्हिलियर्स आणि व्हिव्ह रिचर्ड्स यांचा विक्रम मोडला. वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर आला आणि त्याने गांगुलीचा १००६ धावांचा विक्रम मोडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५५४* षटकारांचा विक्रमही रोहितने नावावर करताना ख्रिस गेलचा ५५३ षटकारांचा विक्रम मोडला.