ICC ODI World Cup India vs Afghanistan Live : आजचा दिवस हा रोहित शर्माचा ( Rohit Sharma) होता.. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत रोहितने आज अनेक वर्ल्ड रेकॉर्ड मोडले... अफगाणिस्ताच्या २७३ धावांचा पाठलाग करायला मैदानावर उतरलेल्या रोहितची बॅट आज गरजली... अफगाणिस्तानच्या एकाही गोलंदाजाला त्याने सोडले नाही आणि त्यामुळेच त्यांचे चेहरे रडकुंडीला आले होते.
कर्णधार रोहितने आज नवी दिल्लीतील स्टेडियम दणाणून सोडले. रोहितने आज वर्ल्ड कप स्पर्धेत वेगवान १००० धावा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार असे वर्ल्ड रेकॉर्ड मोडताना गोलंदाजांची अवस्था दयनीय केली. रोहितने वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक ६ शतकांचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.त्याने ६३ चेंडूंत १२ चौकार व ४ षटकारांसह १०० धावा केल्या. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील हे त्याचे ७वे शतक ठरले आणि असा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज ठरला. भारताकडून वर्ल्ड कप स्पर्धेतील हे सर्वात वेगवान शतक ठरले. कपिल देव यांनी १९८३मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध ७२ चेंडूंत शतक झळकावले होते. राशीद खानने भारताला पहिला धक्का दिला. इशान किशन ४७ धावांवर झेलबाद झाला आणि रोहितसह त्याची १५६ धावांची भागीदारी संपुष्टात आली. वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताकडून झालेली ही पाचवी सर्वोत्तम भागीदारी ठरली. इशानला बाद करूनही राशीद रोहितवर दडपण आणू शकला नाही. त्याच्या षटकात हिटमॅनने ४,४,६ असे फटके खेचून इशानच्या विकेटचा वचपा काढला. आयसीसीच्या व्हाईट बॉल स्पर्धेतील रोहितचे हे ८वे शतक ठरले आणि त्याने सौरव गांगुली, ख्रिस गेल व सचिन तेंडुलकर ( ७) यांचा विक्रम मोडला. राशीदने दुसरी विकेट मिळवली. रोहित ८४ चेंडूंत १६ चौकार व ५ षटकारांसह १३१ धावांवर बाद झाला. विराटसह त्याने ४९ धावा जोडल्या.