ICC ODI World Cup India vs Australia Live Marathi : विराट कोहलीचा ( Virat Kohli) १२ धावांवर झेल सुटला नसता, तर आज काय झालं असतं? हा विचारच करवत नाहीए... रोहित शर्मा, इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना भोपळाही फाडू न देता ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी मागे पाठवले, तेव्हा भारताची अवस्था ३ बाद २ धावा अशी झाली होती. धावांचा पाठलाग करण्यात मास्टर असलेल्या विराटलाही १२ धावांवर जीवदान मिळाले अन् जीवात जीव आला. विराट व लोकेश राहुल यांनी चौथ्या विकेटसाठी विक्रमी १६५ धावांची भागीदारी करून भारताचा विजय निश्चित केला.
विराट कोहलीचे शतक हुकले! पठ्ठ्याने कांगारूंना रडवले, लोकेश राहुलसह मोठे विक्रम नोंदवले
विराट-लोकेशने आज २१५ चेंडूंत १६५ धावा जोडून वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावांच्या भागीदारीचा विक्रम नावावर केला. त्यांनी अजय जडेजा व आरपी सिंग यांनी १९९९मध्ये ओव्हल येथे १४१ धावांचा विक्रम मोडला. हेझलवूडच्या चेंडूवर पूल शॉट मारण्याच्या प्रयत्नात विराट बाद झाला. त्याने ११६ चेंडूंत ६ चौकारांसह ८५ धावा केल्या. प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करून विराटचे कौतुक केले. विराटचे शतक हुकल्याने त्याच्यासह सारेच नाराज झाले होते. पण, भारताला ज्या परिस्थितीतून त्याने बाहेर काढले हे महत्त्वाचे होते. लोकेश व हार्दिक यांनी नंतर फटकेबाजी करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांनी वंदे मातरम गाण्यास सुरूवात केल्यावर अंगावर शहारा उभा राहिला. लोकेशने ११५ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह नाबाद ९७ धावा केल्या. भारताने ४१.२ षटकांत ४ बाद २०१ धावा केल्या.
तत्पूर्वी, रवींद्र जडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. त्याने तीन धक्के दिल्यानंतर कुलदीप यादव ( २-४२), आर अश्विन ( १-३४), जसप्रीत बुमराह ( २-३५), हार्दिक पांड्या ( १-२८) आणि मोहम्मद सिराज ( १-२६) यांनी उत्तम मारा केला. डेव्हिड वॉर्नर ( ४१) आणि स्टीव्ह स्मिथ ( ४६) यांनी ६९ धावांची भागीदारी करून ऑसींचा डाव सावरला होता. पण, कुलदीपने ही जोडी तोडली आणि त्यानंतर जडेजाने कमाल केली. मार्नस लाबुशेन ( २७) आणि मिचेल स्टार्क ( २८) यांनी हातभार लावला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ४९.३ षटकांत १९९ धावांत ऑल आऊट झाला.