ICC ODI World Cup India vs Australia Live Marathi : भारताने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. ३ बाद २ अशी भारताची अवस्था पाहून चेन्नईतील स्टेडियमवर प्रेक्षकांची अवस्था बिकट झालेली. पण, विराट कोहली व लोकेश राहुल यांनी विक्रमी कामगिरी करून भारताला विजय मिळवून दिला. भारताला विजयासाठी ५ धावा हव्या होत्या, तेच लोकेशला शतकासाठी ९ धावांची गरज होती. त्याने शतक पूर्ण करण्यासाठी आयडीया केली होती, पण...
रवींद्र जडेजाने तीन विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला गुडघे टेकण्यास भाग पाडले. कुलदीप यादव ( २-४२), आर अश्विन ( १-३४), जसप्रीत बुमराह ( २-३५), हार्दिक पांड्या ( १-२८) आणि मोहम्मद सिराज ( १-२६) यांनी उत्तम मारा केला. डेव्हिड वॉर्नर ( ४१) आणि स्टीव्ह स्मिथ ( ४६) यांनी ६९ धावांची भागीदारी करून ऑसींचा डाव सावरला होता. मार्नस लाबुशेन ( २७) आणि मिचेल स्टार्क ( २८) यांनी हातभार लावला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ४९.३ षटकांत १९९ धावांत ऑल आऊट झाला.
इशान किशन, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर हे खाते न उघडताच माघारी परतल्याने भारताची अवस्था ३ बाद २ धावा अशी झाली होती. पण, विराट कोहली व लोकेश राहुल यांनी मॅच विनिंग भागीदारी केली. विराट-लोकेशने २१५ चेंडूंत १६५ धावा जोडून वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावांच्या भागीदारीचा विक्रम नावावर केला. विराटने ११६ चेंडूंत ६ चौकारांसह ८५ धावा केल्या. प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करून विराटचे कौतुक केले. लोकेश व हार्दिक यांनी नंतर फटकेबाजी करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. लोकेशने ११५ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह नाबाद ९७ धावा केल्या. भारताने ४१.२ षटकांत ४ बाद २०१ धावा केल्या.
शतकाचा प्लान फसला...विजयासाठी ५ धावांची गरज असताना लोकेश ९१ धावांवर खेळत होता. त्याने आधी चौकार व नंतर षटकार मारून विजयासह शतक पूर्ण करण्याचा प्लान आखला होता. पण, पॅट कमिन्सला त्याने ऑफ साईडला टोलावलेला चेंडू सीमापार गेला अन् लोकेशला ९७ धावांवर समाधान मानावे लागले. चेंडू षटकार गेल्याचे लोकेशलाही आश्चर्य वाटले आणि हे त्याने सामन्यानंतर कबुल केले. तो म्हणाला, मला शतक पूर्ण करायचे होते आणि मी चौकार व षटकार मारणार होतो. पण, आशा करतो की पुढच्या वेळेस मला यश मिळेल.