ICC ODI World Cup India vs Australia Live Marathi : भारतीय संघाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने हैराण केले होते. जसप्रीत बुमराहने तिसऱ्या षटकात धक्का दिल्यानंतर वॉर्नर व स्टीव्ह स्मिथ या जोडीने ऑसींचा डाव सावरला. वॉर्नरने या सामन्यातून वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात कमी इनिंग्जमध्ये १००० धावांचा टप्पा ओलांडला आणि सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेला विक्रम मोडला. अर्धशतकाच्या जवळ आलेल्या वॉर्नरला फिरकीपटू कुलदीप यादवने ( Kuldeep Yadav) बाद केले. कुलदीपच्या चेंडूवर वॉर्नर फसला अन् त्याने मारलेला चेंडू सरळ गोलंदाजाच्या हातात जाऊन बसला.
गोंधळ! टीम इंडियाची जर्सी घालून 'तो' मैदानावर घुसला; विराट, लोकेशला भेटला अन्...
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दोन षटकं सावध खेळ करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहने धक्का दिला. मिचेल मार्शचा ( ०) भन्नाट झेल विराट कोहलीने पहिल्या स्लीपमध्ये घेतला. डेव्हीड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांनी संयमी खेळ करताना डाव सावरला. वॉर्नरने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात जलद १००० धावा करण्याचा विक्रम नावावर केला. त्याने १९ इनिंग्जमध्ये हा पराक्रम केला. सुरेख फटके मारणाऱ्या वॉर्नरला बाद करण्यासाठी रोहितने ८व्या षटकात आर अश्विनला आणले. अश्विनने टाकलेल्या चेंडूला मिळालेली उसळी पाहून स्मिथ चकित झाला. वॉर्नरने मारलेला फटका अडवताना हार्दिक पांड्याच्या बोटाला दुखापत झाली आणि तो काहीकाळ मैदानाबाहेर गेला होता. . ( IND vs AUS Live Scoreboard )
स्मिथ व वॉर्नर यांनी ६९ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला कुठे सावरले होते, तोच कुलदीप यादवने भागीदारी तोडली. कुलदीपच्या चेंडूवर वॉर्नरने सरळ फटका मारला, परंतु तो चेंडू कुलदीपच्या हातात सहज विसावला. वॉर्नर ५२ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने ४१ धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाला १६.३ षटकांत ७४ धावांवर दुसरा धक्का बसला.