ICC ODI World Cup India vs Australia Live Marathi : ऑस्ट्रेलियाला १९९ धावांवर रोखल्यानंतर भारतीय सलामीवीरच ही धावसंख्या पार करून देतील असे वाटले होते. पण, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी कहर केला. भारताच्या तीन फलंदाजांना शून्यावर माघारी पाठवले. इशान किशन, रोहित शर्मा व श्रेयस अय्यर हे खातंही न उघडता माघारी परतले. जोश हेझलवूडने एका षटकात दोन धक्के दिले. त्यानंतर विराट कोहलीचाही १२ धावांवर असताना झेल उडाला होता अन् चेपॉकवरील चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला होता, पण...
इशान किशन, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर 'Duck' ठरले; ऑस्ट्रेलियन गोलंदाज गरजले, Video
मिचेल स्टार्कच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात इशान ( ०) स्लीपमध्ये झेल देऊन परतला. त्यानंतर हेझलवूडने रोहितला पायचीत केले. श्रेयसने सावध खेळ करणे अपेक्षित होते, परंतु त्याने कव्हरच्या दिशेने फटका मारला अन् डेव्हिड वॉर्नरने तो टिपला. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचे दोन्ही सलामीवीर भोपळ्यावर बाद होण्याची ही दुसरी वेळ ठरली. यापूर्वी १९८३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध सुनील गावस्कर व क्रिष्णमचारी श्रीकांत शून्यावर बाद झाले होते.
विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी चांगला खेळ केलेला. पण, जोश हेझलवूडच्या बाऊन्सरवर विराटचा जागच्याजागी झेल उडाला होता. मिचेल मार्श व अॅलेक्स केरी दोघंही झेल घ्यायला पळाले. पण, मार्शकडून झेल सुटला अन् चाहत्यांनी सुटकेचा श्वास टाकला.