ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : तुम्ही माझ्या घरच्या मैदानावर उतरलाय... त्यामुळे मला चॅलेंज देण्याच्या नादात पडूच नका... असा इशाराच जणू रोहित शर्माने पहिल्या षटकापासून न्यूझीलंडच्या गोलंदाजांना दिलेला. रोहितच्या पुल शॉट्सने स्टेडियम दणाणून निघाले होते. वानखेडे स्टेडियमवर वन डे सामन्यातील अपयश आज पुसून टाकायचं अन् टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारून द्यायची, असा निर्धार रोहितच्या प्रत्येक फटक्यातून व्यक्त होत होता. पण, केन विलियम्सन ( ज्याला भारतीय आवडीने केन मामा म्हणतात) याने रोहितला बाद करण्याची चालून आलेली संधी हेरली अन् अफलातून झेल घेतला. मग...
रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! वर्ल्ड कपमध्ये भीमपराक्रम करणारा जगातला पहिला फलंदाज, Video
रोहितच्या फटकेबाजीने आज वानखेडे स्टेडियम दणाणून सोडले. त्याने शुबमन गिलसह पहिल्या विकेटसाठी ८.२ षटकांत ७१ धावा जोडल्या. टीम साऊदीच्या चेंडूवर रोहितचा फटका चुकला अन् उत्तुंग उडाललेा चेंडू केन विलियम्सनच्या सुरक्षित हातात विसावला. रोहित २९ चेंडूं ४ चौकार व ४ षटकारांसह ४७ धावांवर झेलबाद झाला. पण, बाद होण्यापूर्वी त्याने वर्ल्ड कपमध्ये षटकारांची हाफ सेंच्युरी साजरी करणाऱ्या जगातील पहिल्या फलंदाजाचा मान पटकावला. ख्रिस गेलने वन डे वर्ल्ड कपमध्ये ४९ षटकार खेचले होते. रोहितच्या विकेटनंतर स्टेडियमवर स्मशान शांतता पसरली.
आजच्या लढतीपूर्वी रोहितने वानखेडेवर १६, २०, १०, ४ अशा धावा केल्या होत्या. आज तो कुणालाही जुमानत नव्हता, परंतु साऊदीच्या चेंडूवर मारलेला फटका उत्तुंग उडाला. चेंडू टिपण्यासाठीने काही पावलं मागे सरकला... आतापर्यंत वानखेडेवर जल्लोष करणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाचा जीव टांगणीला लागलेला.. केनकडून झेल सुटावा अशीच सारे प्रार्थना करत होते, परंतु केनसारख्या खेळाडूकडून अशी चूक होणे अवघडच... त्याने चेंडू दोन्ही हाताने घट्ट पकडला अन् कोलांटीउडी घेऊन पुन्हा उभा राहून जल्लोष केला. स्टेडियमवर स्मशान शांतता पसरली.