ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : न्यूझीलंडचा संघ 'डेंजर' का आहे याची प्रचिती पुन्हा एकदा आली. भारताने ठेवलेल्या ३९८ धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना दोन्ही सलामीवीर ३९ धावांवर माघारी परतूनही किवींकडून कडवी टक्कर मिळाली. केन विलियम्सन आणि डॅरिल मिचेल यांनी भारतीय चाहत्यांना गॅसवर ठेवले होते. २०१९च्या कटू आठवणी हळुहळू डोळ्यासमोर उभ्या राहत होत्या... मोहम्मद शमीने दोन वेळा भारताला सामन्यात पकड मिळवून दिलेली, परंतु अन्य गोलंदाजांकडून त्याला साथ मिळत नव्हती.. भारतीय खेळाडू निराश अन् चाहते हताश झालेले दिसले. अखेर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद परतला तो शमीने घेतलेल्या सातव्या विकेटने. कुलदीप यादवच्या शेवटच्या टप्प्यातील दोन षटकाने खऱ्या अर्थाने मॅच फिरवली.
ही सेट जोडी तोडण्यासाठी शमीला पुन्हा गोलंदाजीला आणले गेले आणि त्याने ३३ व्या षटकात मॅचला कलाटणी दिली. केन ७३ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ६९ धावांवर बाद झाला आणि पाठोपाठ टॉम लॅथमही भोपळ्यावर पायचीत झाला. शमीची ही वर्ल्ड कपमधील पन्नासावी विकेट ठरली आणि असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज बनला. त्याने सर्वात कमी १७ सामन्यांत हा टप्पा ओलांडून वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. मिचेल स्टार्कने १९ डावांत विकेट्सचे अर्धशतक साजरे केले होते. या विकेटनंतर न्यूझीलंड पूर्णपणे बॅकफूटवर फेकले गेले आणि इथून विजय मिळवणे अशक्यच झाले.
न्यूझीलंडला ३६ चेंडूंत ९९ धावा करायच्या होत्या. शमीने आजच्या सामन्यातील पाचवी विकेट घेताना मिचेलला बाद केले. मिचेलने ११९ चेंडूंत ९ चौकार व ७ षटकारांसह १३४ धावा केल्या. वर्ल्ड कप मधील चौथ्यांदा शमीने डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आणि उपांत्य फेरीत पाच विकेट घेणारा तो पहिला भारतीय ठरला. शिवाय सर्वाधिक ४ वेळा ५ विकेट्स घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही त्याने नावावर नोंदवला. सिराजला अखेर ४८व्या षटकात विकेट मिळाली. शमीने ५७ धावांत ७ विकेट्स घेत न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ४८.५ षटकांत ३२७ धावांत तंबूत पाठवला. भारताने ७० धावांनी हा सामना जिंकला. २०११ नंतर भारतीय संघ वर्ल्ड कप फायनल खेळणार आहे.
तत्पूर्वी, रोहित शर्मा (४७) आणि शुबमन गिल ( ८०*) यांनी ७१ धावांची वादळी सुरुवात करून दिल्यानंतर विराट व श्रेयस यांनी १२८ चेंडूंत १६३ धावांची भागीदारी केली. विराटने ११३ चेंडूंत ९ चौकार व २ षटकार खेचून ११७ धावा केल्या. श्रेयसने ७० चेंडूंत ४ चौकार व ८ षटकारांसह १०५ धावांची वादळी खेळी केली. लोकेश राहुलसह त्याने २९ चेंडूंत ५४ धावा जोडल्या. लोकेश २० चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ३९ धावांवर नाबाद राहिला. भारताने ४ बाद ३९७ धावा केल्या.