ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांचीही धुलाई झाली. केन विलियम्सन आणि डॅरिल मिचेल यांच्या १८१ धावांच्या भागीदारीमुळे वानखेडे स्टेडियमवर शांतता पसरली होती. त्यात भारतीय खेळाडूंकडून झेल सुटले, रन आऊटची संधी गमावली गेली अन् पायचीतचा निर्णय विरोधात गेला.. त्यामुळे तणाव वाढत चालले होते. शमीने न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनचा झेल सोडला, परंतु याची भरपाई त्यानेच केली. ३३व्या षटकात शमीने दोन विकेट्स घेतल्या आणि भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले.
केन विलियम्सनचं 'लक' की लोकेश राहुलची अती'घाई'? भारताची डोकेदुखी कुणामुळे वाढली?
मोहम्मद शमीच्या दणक्यामुळे न्यूझीलंडने दोन्ही सलामीवीर ३९ धावांवर गमावले होते. डेवॉन कॉनवे ( १३) आणि रचिन रवींद्र ( १३) यांची विकेट शमीने मिळवून दिली. किवींना पहिल्या १० षटकांत ४६ धावाच करता आल्या होत्या, परंतु केन विलियम्सन आणि डॅरिल मिचेल ही जोडी खेळप्टटीवर उभी राहिली. रोहित वारंवार गोलंदाजीत बदल करूनही काहीच उपयोग होत नव्हता. ३ षटकांचा स्पेल टाकून विश्रांतीवर गेलेल्या शमीला पुन्हा बोलावले गेले, परंतु त्याचेही स्वागत चौकार षटकाराने झाले. केन व मिचेल या दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावले. मिचेलने कुलदीपच्या गोलंदाजीवर १०७ मीटर लांब षटकार लगावला आणि या वर्ल्ड कपमधील तो उत्तुंग षटकार ठरला.
२९व्या षटकात जसप्रीतच्या गोलंदाजीवर केनकडून चूक झाली होती, परंतु शमीने सोपा झेल टाकला. मिचेलने हात मोकळे करताना कौशल्याचा पुरेपूर वापर करून चौकार-षटकार मिळवले आणि केनसह दीडशे धावांची भागीदारी पूर्ण केली. न्यूझीलंडने ३० षटकांत १९९ धावा केल्या आणि त्यांना पुढील २० षटकांत १९९ धावाच करायच्या होत्या. मिचेलने ८५ चेंडूंत शतक पूर्ण केले. ३३व्या षटकात शमीच्या गोलंदाजीवर फ्लिक मारण्याचा केनचा प्रयत्न फसला अन् सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर सुरेख झेल टिपला. केन ७३ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ६९ धावांवर बाद झाला आणि मिचेलसह त्याची १८१ ( १४९ चेंडू) धावांची भागीदारी तुटली. पाठोपाठ त्याने टॉम लॅथमलाही शून्यावर पायचीत केले.
शमीची ही वर्ल्ड कपमधील पन्नासावी विकेट ठरली आणि असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज बनला. त्याने सर्वात कमी १७ सामन्यांत हा टप्पा ओलांडून वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. मिचेल स्टार्कने १९ डावांत विकेट्सचे अर्धशतक साजरे केले होते. ग्लेन मॅकग्राथ सर्वाधिक ७१ विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर मुथय्या मुरलीधरन ( ६८), मिचेल स्टार्क ( ५९), लसिथ मलिंगा ( ५६), वसिम अक्रम ( ५५) व ट्रेंट बोल्ट ( ५३) यांचा क्रमांक येतो. Web Title: ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : MOHAMMED SHAMI BECOMES THE FASTEST TO TAKE 50 WICKETS IN 48 YEARS WORLD CUP HISTORY, he becomes the FIRST Indian to take 50 World Cup wickets
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.