ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला अन् पहिल्या षटकापासून न्यूझीलंडच्या गोलंदाजांना चोप दिला. वन डे वर्ल्ड कप इतिहासात सर्वाधिक ५० षटकारांचा वर्ल्ड रेकॉर्ड रोहितने नावावर करताना टीम इंडियाला दणदणीत सुरुवात करून दिली. पण, टीम साऊदी व केन विलियम्सन यांनी त्याचा वेगाने धावणारा रथ अडवला. रोहित २९ चेंडूं ४ चौकार व ४ षटकारांसह ४७ धावांवर झेलबाद झाला आणि शुबमन गिलसोबत त्याची ७१ धावांची भागीदारी संपुष्टात आली. त्याच षटकात विराट कोहलीसाठी LBW चे जोरदार अपील झाले अन् DRS घेतला गेला. रिप्लेत चेंडू बॅटला घासून पॅडवर आदळल्याचे दिसले अन् अनुष्का शर्मासह सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
नाद खुळा! शुबमन गिलचे सचिनच्या पावलावर पाऊल; रोहितसह मोडला २३ वर्षांपूर्वीचा विक्रम
शुबमनने अर्धशतक झळकावताना सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अर्धशतक झळकावणारा तो दुसरा भारतीय सलामीवीर ठरला. सचिनने ( १९९६, २००३ व २०११) तीन वेळा असा पराक्रम केला आहे. २३व्या षटकात शुबमनने तंबूत परत जाण्याचा निर्णय घेतला. त्याने ६५ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ७९ धावांची खेळी केली. मुंबईच्या उष्णतेचा त्याला फटका बसला आणि त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. फिजिओ त्याच्याकडे धावत आले. काहींच्या मते क्रॅम्प आल्याने तो रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतला आहे.
१९८३च्या वर्ल्ड कपमध्ये दिलीप वेंगसरकर वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात आमि १९९३ मध्ये अजय जडेजा न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रिटायर्ड हर्ट झाला होता.