ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : विराट कोहलीच्या पन्नासाव्या शतकाने वर्ल्ड कप स्पर्धेतील आजचा उपांत्य फेरीचा सामना संस्मरणीय केला. भारत-न्यूझीलंड यांच्यातला हा हायव्होल्टेज सामना पाहण्यासाठी अनेक स्टार वानखेडेवर उपस्थित होते. त्यांच्या साक्षीने आज विराटने विश्वविक्रमांचा पाऊस पाडला... रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी पुन्हा एकदा टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर विराट व श्रेयस अय्यर या जोडीने किवी गोलंदाजांची पार वाट लावली. विराटने वर्ल्ड कपच्या एकाच आवृत्तीत ७०० हून अधिक धावा करण्याच्या पहिल्या फलंदाजाचा मान पटकावला.
एक दूजे के लिए बने हम! कोहलीचे शतक अन् अनुष्काचा फ्लाईंग किस; विराट 'इश्क'
रोहित शर्माने २९ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ४७ धावांची वादळी खेळी करून टीम इंडियाला पुन्हा एकदा आक्रमक सुरुवात करून दिली. त्यानंतर शुबमन गिलने दमदार फटकेबाजी केली, परंतु पायात गोळा आल्याने त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडावे लागले. त्याने ६५ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ७९ धावांची खेळी केली. विराट व श्रेयस यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२९ चेंडूंत १६३ धावांची विक्रमी भागीदारी केली. विराटने वानखेडेवर ऐतिहासिक पन्नासावे शतक झळकावले. शतक पूर्ण करताच त्याने हवेत उडी मारली.. गुडघ्यावर बसून ग्लोव्ह्ज व हेल्मेट काढले... अनुष्काला फ्लाईंग किस दिला अन् नंतर सचिन तेंडुलकरला मानाचा मुजरा केला.
श्रेयसनेही ६७ चेंडूंत शतक झळकावले. २००३ मध्ये सौरव गांगुलीने उपांत्य फेरीत ( वि. केनिया) शतक झळकावले होते आणि त्याच्यानंतर वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये विराट व श्रेयस यांनी शतक झळकावले. वर्ल्ड कपमध्ये भारतीयाकडून झालेले हे तिसरे जलद शतक ठरले. लोकेश राहुलने ६२ चेंडूंत ( वि. नेदरलँड्स, २०२३) आणि रोहित शर्माने ६३ चेंडूंत ( वि. अफगाणिस्तान २०२३) शतक झळकावले होते. श्रेयस ७० चेंडूंत ४ चौकार व ८ षटकारांसह १०५ धावांवर झेलबाद झाला. भारताने ४ बाद ३९७ धावा चोपल्या. लोकेश २० चेंडूंत ३९ धावांवर नाबाद राहिला, तर गिल ८० धावांवर नाबाद राहिला.