ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : भारतीय संघाचा स्टार विराट कोहली ( Virat Kohli) आज वर्ल्ड रेकॉर्डचा पाऊस पाडतोय... वर्ल्ड कपच्या एका पर्वात सर्वाधिक ८ वेळा फिफ्टी प्लस धावा करण्याचा विश्वविक्रम नावावर केल्यानंतर विराटने २० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. वर्ल्ड कपच्या एका पर्वात सर्वाधिक धावाचा सचिन तेंडुलकरचा विक्रम आज विराटने तोडला.
विराट कोहलीचा आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड! सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग यांना मागे टाकले
रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्या वादळी खेळीनंतर विराट कोहलीने ( Virat Kohli) वानखेडेचे मैदान गाजवले. रोहितने २९ चेंडूं ४ चौकार व ४ षटकारांसह ४७ धावा कुटल्या. शुबमन दमदार फटकेबाजी करत होता, परंतु २३व्या षटकात तो रिटायर्ड हर्ट म्हणून तंबूत परतला. त्याच्या पायात गोळा आला होता आणि मैदान सोडावे लागत असल्याने तो नाराज झाला होता. त्याने ६५ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ७९ धावांची खेळी केली. विराटने नंतर मोर्चा सांभाळला आणि अर्धशतक झळकावले. वर्ल्ड कपच्या एकाच पर्वात सर्वाधिक ८ वेळा फिफ्टी प्लस धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला. त्याने सचिन तेंडुलकर ( २००३) व शाकिब अल हसन ( २०१९) यांचा ७ फिफ्टी प्लस धावांचा विक्रम मोडला.
वर्ल्ड कपच्या एका पर्वात सर्वाधिक ६७३ धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या ( २००३) नावावर आहे आणि विराटने तोही आज मोडला. रोहित शर्माने २०१९मध्ये ६४८ धावा केल्या होत्या. सचिन व मॅथ्यू हेडन ( ६५९) यांच्यानंतर वर्ल्ड कपच्या एका पर्वात ६५० हून अधिक धावा करणारा विराट तिसरा फलंदाज ठरला. विराटला लोकल बॉय श्रेयस अय्यरची दमदार साथ मिळाली.