Join us  

माझा हिरो, माझी लाईफ पार्टनर समोर होते, हा आनंद शब्दात व्यक्त करणे अवघड - विराट कोहली 

ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : विराट कोहलीचे पन्नसावे शतक अन् श्रेयस अय्यरच्या वेगवान शतकाच्या जोरावर भारताने उपांत्य फेरीत न्यूझीलंडसमोर विजयासाठी ३९८ धावांचे लक्ष्य ठेवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 6:12 PM

Open in App

ICC ODI World Cup IND vs NZ Semi Final Live : विराट कोहलीचे पन्नसावे शतक अन् श्रेयस अय्यरच्या वेगवान शतकाच्या जोरावर भारताने उपांत्य फेरीत न्यूझीलंडसमोर विजयासाठी ३९८ धावांचे लक्ष्य ठेवले. वर्ल्ड कपच्या एका पर्वात सर्वाधिक धावा, सर्वाधिक फिफ्ट प्लस धावा.. असे विश्वविक्रम आज विराटने नावावर केले. रोहित शर्मानेही वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात सर्वाधिक ५० षटकारांचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. श्रेयस वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वात वेगवान शतक झळकावणारा तिसरा फलंदाज ठरला. अशा अनेक विक्रमांनी आजचा सामना गाजला.

रोहित शर्माने (४७) वादळी खेळी करून टीम इंडियाला आक्रमक सुरुवात करून दिली. त्यानंतर शुबमन गिल ७९ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. विराट व श्रेयस यांनी १२८ चेंडूंत १६३ धावांची भागीदारी करून भारताला तीनशे पार नेले. विराटच्या विक्रमी खेळीला ४४व्या षटकात ब्रेक लागला. तो ११३ चेंडूंत ९ चौकार व २ षटकार खेचून ११७ धावांवर बाद झाला. श्रेयसने ७० चेंडूंत ४ चौकार व ८ षटकारांसह १०५ धावांची वादळी खेळी केली. लोकेश राहुलसह त्याने २९ चेंडूंत ५४ धावा जोडल्या. लोकेश २० चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ३९ धावांवर नाबाद राहिला, तर शुबमन ६६ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ८० धावांवर नाबाद राहिला. भारताने ४ बाद ३९७ धावा केल्या आणि वर्ल्ड कपच्या बाद फेरीतील ही भारताची सर्वोत्तम धावसंख्या ठरली.

विराट कोहली काय म्हणाला?मी स्तब्ध झालो...     पुन्हा एकदा एका दिग्गज व्यक्तिने ( सचिन तेंडुलकर) माझे कौतुक केले. हे स्वप्नासारखं आहे आणि ते सत्यात उतरलं. हा आमच्यासाठी मोठा सामना आहे आणि मला माझी भूमिका बजावायची होती. माझ्यासाठी माझा संघ जिंकणे महत्त्वाचे आहे. मला या स्पर्धेकरिता जी भूमिका दिली आहे ती मी निभावतोय आणि शेवटच्या षटकापर्यंत खेळण्याचा प्रयत्न करतोय.. सातत्य हे यामागचे रहस्य आहे.

सचिन पाजी स्टँडमध्ये उपस्थित होते. हा आनंद व्यक्त करणे अवघड आहे. माझी लाईफ पार्टनर, माझा हिरो समोर उपस्थित आहेत आणि वानखेडेवरील तमाम चाहते. ४०० धावांपर्यंत मजल मारल्याचे श्रेय श्रेयस अय्यरलाही जाते. लोकेशने अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी केली.  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपविराट कोहलीसचिन तेंडुलकरभारत विरुद्ध न्यूझीलंड