ICC ODI World Cup India vs Pakistan Live : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाकिस्तानने सपशेल शरणागती पत्करलेली पाहायला मिळाली. पाकिस्तानने अवघ्या ३६ धावांत ८ फलंदाज गमावले. जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा व सिराज यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. पाकिस्तानच्या या दयनीय अवस्थेनंतर वीरेंद्र सेहवागने ( Virender Sehwag) सोशल मीडियावर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याला ट्रोल केले.
अब्दुल्लाह शफीक ( २०) आणि इमाम-उल-हक ( ३६) हे माघारी परतल्यानंतर बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांनी ८३ धावांची भागीदारी करुन पाकिस्तानला सावरले. पण, सिराजने अर्धशतकवीर बाबरचा ( ५०) त्रिफळा उडवला अन् नंतर कुलदीप यादवने एकाच षटकात दोन धक्के देऊन पाकिस्तानला बॅकफूटवर फेकले. सौद शकील ( ६) आणि इफ्तिखार अहमद ( ४) हे कुलदीपचे बळी ठरले. त्यानंतर जसप्रीत बुमराहने रिझवानचा ( ४९) त्रिफळा उडवला आणि पाठोपाठ शादाब खानचीही ( २) दांडी गुल केली. हार्दिकने पाकिस्तानला आणखी एक धक्का देताना मोहम्मद नवाजला ( ४) झेलबाद केले आणि पाकिस्तानचे ८ फलंदाज १८७ धावांवर तंबूत परतले. रवींद्र जडेजाला आक्रमक फटके मारण्याच्या प्रयत्नात हसन अली ( १२) झेलबाद झाला. २ बाद १५५ वरून पाकिस्तानचा संपूर्ण संघ १९१ धावांत तंबूत परतला.
वर्ल्ड कप स्पर्धेत कमी धावांत ८ विकेट्स पडण्याची ही चौथी वेळ. या नकोशा विक्रमात भारतीय संघ अव्वल आहे. २०११ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १ बाद २६७ वरून भारतीय संघ २९६ धावांवर ऑल आऊट ( ९-२९) झाला होता. १९७९मध्ये वेस्ट इंडिजने इंग्लंडच्या ८ फलंदाजांना ११ धावांत ( २ बाद १८३ वरून १९४ ऑल आऊट) आणि २०११ मध्ये भारताने वेस्ट इंडिजच्या ८ फलंदाजांना ३४ धावांवर ( २ बाद १५४ वरून १८८ ऑल आऊट) माघारी पाठवले होते.